Headlines

विद्युत पुरवठ्यामधील समस्यांचा‎उद्योजकांनी बैठकीत वाचला पाढा‎:उद्योगांचे भविष्य अस्थिर, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची वीज समस्यांवर चर्चा‎




प्रतिनिधी | अकोला अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने महावितरण अंतर्गत औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत सेलची बैठक घेण्यात आली. असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महावितरणचे अभियंते, संबंधित अधिकारी, तसेच तांत्रिक पथक उपस्थित होते. उद्योजकांनी विद्युत पुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. कधी काळी अकोल्यात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र काळाच्या ओघात संधी कमी होत गेल्या. नंतरच्या काळात मोठे उद्योग, प्रकल्प अकोल्यात सुरू होऊन येथेच हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा तरुणाईला होती. मात्र अपेक्षाभंग झाला. जिल्ह्यात ऑटोमोबाइल्स, आयटी पार्कसारखे मोठे उद्योग नाहीत. कौशल्यानुसार रोजगार, संधीच्या शोधात वऱ्हाडातील तरुणाईला मुंबई, पुणे, नाशिकसारख्या महानगरात जावे लागते. अशातच विद्युत पुरवठ्याबाबतच्या समस्यांमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. याबाबत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार सचिव नितीन बियाणी यांनी मानले. बैठकीस लघुउद्योग भारती, विदर्भ चेंबर, अकोट इंडस्ट्रीज असोसिएशन, मूर्तिजापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, स्टोन क्रशर असोसिएशन, प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनसह इतर औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या आहेत समस्या : उद्योजकांनी या बैठकीत विद्युत पुरवठ्याबाबतच्या समस्या मांडल्या. वारंवार होणारे वीज ट्रिपिंग, नवीन वीज कनेक्शन मिळण्यात होणारा विलंब, काही प्रकरणांमध्ये एक ते दीड वर्षे, अकोला विकास केंद्रात नवीन सबस्टेशन उभारणीची गरज, तुकाराम सबस्टेशनवरील वाढता लोड कमी करण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, बाळापूर परिसरातील स्पिनिंग मिलसाठी सुरळीत वीजपुरवठा, तसेच पिंपळकोठा, रिघोरा, सराळा परिसरातील ट्रिपिंग समस्या यासारखे महत्त्वाचे मुद्दे मांडले. एमआयडीसीमधील वीज बिलिंग व प्रोसेसिंगमध्ये होणारा विलंब, ऑनलाइन तक्रारींवर प्रतिसादाचा अभाव, स्वतंत्र विद्युत कर्मचारी नियुक्ती, मान्सूनपूर्व देखभाल, तसेच नवीन उद्योजकांना वेळेत वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याबाबतही लक्ष वेधण्यात आले. ड्रेनेज लाइनवरील विद्युत खांबामुळे सुरक्षेचाही प्रश्न एसपी कार्यालयाजवळ ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांमुळे सुरक्षेच्या धोक्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकी दरम्यान मार्च महिन्यात निर्गमित करण्यात आलेली औद्योगिक वीज देयके सदोष असल्याचा मुद्दा विशेषत्वाने मांडण्यात आला. वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन टाइम ऑफ डे कालावधीप्रमाणे मीटर अद्ययावत न केल्यामुळे दिवसाचा वापर रात्री दाखवला जात असून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. अभियंत्यांनी तातडीने चाचणी विभागामार्फत पडताळणी करून देयके दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *