Headlines

विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी:दौंड रेल्वे न्यायालयाचा निकाल; तीन हजार रुपये दंड, 2014 मधील गुन्ह्यात पोलिसांना यश




लातूरहून मुंबईकडे रेल्वेने प्रवास करत असताना तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाला दौंड रेल्वे न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनील दहातोंडे यांनी 1 वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रौफ रब्बानी शेख (वय 40, रा. श्यामनगर, उषाकिरण पेट्रोल पंपामागे, लातूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट 2014 रोजी तरुणी लातूरहून मुंबईकडे रेल्वेने प्रवास करीत होती. दौंड रेल्वे स्थानकातून गाडी सुटल्यानंतर सुमारे 10 ते 15 मिनिटांनी आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी दौंड रेल्वे न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. सरकारी वकील प्रिया शिंदे यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. प्रभारी अधिकारी हिमालय जोशी आणि कोर्ट अंमलदार मोहम्मद शेख यांनी खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय शंकेश्वरी, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भीमा हागवणे यांनी तपास केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *