![]()
सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सागर रंगनाथ दौंड (२९, रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले . सागर दौंड यांनी रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतगट क्रमांक ३३२ मध्ये विषारी औषध प्राशन केले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. वडिलांनंतरचा हरपला आधार सागर दौंड यांच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास सपोनि पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगल आरके करत आहेत.
Source link
विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू:कर्जबाजारीपणास कंटाळून पानवडोद येथे उचलले टोकाचे पाऊल