![]()
नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व स्वच्छताविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी शहरात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बुद्ध विहार ते रेल्वे तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा सहआयुक्त शाम गोसावी, नगराध्यक्ष शालिनी खताळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, गटनेते फिरोज पठाण, आरोग्य सभापती उमेश कस्तुरे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि निरोगी शहर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी हॉटेल असोसिएशन तसेच धम्मगिरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच ‘वेस्ट टू एनर्जी’ या संकल्पनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इगतपुरी हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने हॉटेल व पर्यटन क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली. ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याचे योग्य संकलन व वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्चक्रणाला प्रोत्साहन देणे याबाबत त्यांनी विविध सूचना दिल्या.तसेच कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ उपक्रमाचा अभ्यास करून नगरपरिषद, हॉटेल व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि संबंधित घटकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या माध्यमातून कचऱ्याची समस्या कमी करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. प्रतिनिधी | सटाणा मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सटाणा शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) तसेच रोव्हर-रेंजर्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. प्राचार्य अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महाविद्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा व प्लास्टिक संकलित करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य पाटील म्हणाले, गांधी विचार म्हणजे भूतकाळातील स्मरणरंजन नव्हे, तर वर्तमानातील समस्यांकडे पाहण्याची मूल्याधिष्ठित दृष्टी आहे. सत्य, अहिंसा, समता, स्वावलंबन, साधेपणा, श्रमप्रतिष्ठा, सहिष्णुता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या गांधीवादी मूल्यांची आजच्या काळात अधिक आवश्यकता आहे. गांधीजींच्या विचारांचे अंधानुकरण करण्याऐवजी त्यातील कालसुसंगत मूल्यांचे आधुनिक संदर्भात पुनर्वाचन करून त्यांची जीवनात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अभियानात राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. भास्कर निकम यांच्यासह एनएसएस, एनसीसी व रोव्हर-रेंजर्सचे विद्यार्थी तसेच सटाणा नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Source link
महात्मा गांधी जयंती:सटाण्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेवासंकल्प अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश