![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निमेश पटेल यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची खासदार कल्याण काळे व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. दौऱ्यात अनेक भागांत पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच पावसाअभावी उत्पादन न झालेल्या पिकांसाठी पीकविमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी खासदार कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, निमेश पटेल यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, पीककर्ज व वीजबिल पूर्णपणे माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून चारा व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच फळबागा, केळी, ऊस आणि इतर पिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि वसतिगृहांचे शुल्कही पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी; काँग्रेसची मागणी:शेतमजुरांना 25 हजार रुपये द्यावेत, महसूलमंत्री बावनकुळे यांना निवेदन