![]()
शेतीपंपांसाठी सहा तास मिळणारा वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री गणेशवाडी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढला. महावितरणविरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि नियमित व सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली. यापूर्वी शेतीपंपांसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा कालावधी कमी करून केवळ सहा तासांवर आणला आहे. त्यातही आठवड्यातून तीन ते चार दिवस वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. उर्वरित वेळेतही तार तुटणे, तांत्रिक बिघाड किंवा भारनियमन यामुळे पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शेतीसाठी पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी पंप बंद ठेवावे लागत आहेत. शनिवारी मध्यरात्री मोठ्या संख्येने शेतकरी गणेशवाडी उपकेंद्रावर एकत्र आले. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वीज पुरवठा बंद ठेवतो, असे तेथील ऑपरेटरने सांगितले. या उत्तरामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला. त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पत्राला केराची टोपली? आमदार प्रशांत बंब यांनी मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. लोडशेडिंगचे वेळापत्रक जाहीर करणे, जीर्ण ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि तारांची दुरुस्ती करणे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, महावितरणने आमदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
Source link
वीजपुरवठा सुरळीत करा; कायगाव येथील शेतकऱ्यांचा उपकेंद्रावर मोर्चा:८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी, महावितरणविरोधात संताप