“राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा मीदेखील वृत्तपत्रे आणि माध्यमांद्वारे ऐकत आहे. जोपर्यंत ते अधिकृत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही; मात्र सध्या त्यांचा कल नक्कीच
.
सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरून भाजपला ‘दिलदार’ म्हणणाऱ्या शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवताना, “संजय राऊतांना आता कोणाला दिलदार, कोणाला सालदार, कोणाला हमालदार तर कोणाला हवालदार म्हणायचे एवढेच काम उरले आहे,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. यासोबतच त्यांनी जळगाव जिल्हा बँकेतील सत्तास्थापना, महायुतीतील स्थानिक नाराजी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गिरणा धरणातून सोडल्या जाणाऱ्या 35 दिवसांच्या आवर्तनाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
शरद पवार गटाचा कल महायुतीकडेच; अधिवेशनापूर्वी व्हिप काढणे ही नेहमीची पद्धत!
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाने आपल्या खासदारांना बजावलेला ‘व्हीप’ आणि त्यातून सुरू झालेल्या महायुती प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले मत स्पष्ट केले. प्रत्येक राजकीय पक्ष लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद अधिवेशनापूर्वी आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावत असतो; त्यानुसार राष्ट्रवादीनेही व्हिप काढला असेल. मात्र, या निमित्ताने त्यांचा पक्ष महायुतीचा घटक बनेल अशा चर्चा सुरू आहेत. त्यांचा कल सध्या तिकडेच झुकलेला दिसत असून, ते महायुतीत आल्यास आमचे स्वागतच राहील.
संजय राऊतांवर बोचरी टीका
10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देत असेल तर भाजप ‘दिलदार’ ठरेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर पलटवार करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना आता कोणाला दिलदार, कोणाला सालदार, कोणाला हमालदार आणि कोणाला हवालदार म्हणायचे, यापलीकडे दुसरे कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही.

जळगाव जिल्हा बँकेत 12 जागांसह महायुतीची सत्ता
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या यशानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत आणि स्थानिक आमदारांमधील नाराजीबाबत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीने 12 जागा मिळवून सत्ता निश्चित केली आहे. बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी, आधी अंतिम निकाल येऊ द्या; निकालानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून सामोपचाराने यावर निर्णय घेऊ.
किशोर पाटील व मंगेश चव्हाण वादावर भाष्य
महायुतीमध्ये खडा टाकून वाद लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणाला फोन केला याचे उत्तर ते स्वतःच देऊ शकतील; तर आमदार किशोर पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामाबाबत शंका असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. निवडणुकीला केवळ 2 दिवस शिल्लक असून ज्यांना जागा मिळाली नाही त्यांची नाराजी स्वाभाविक आहे; आम्ही वरिष्ठांच्या पातळीवर बसून ही कटुता व नाराजी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत.
गिरणा धरणातून 35 दिवसांचे आवर्तन सोडणार
जामनेर व जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि जळणाऱ्या पिकांबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली. पावसाअभावी पीक पंचनाम्यांची टक्केवारी 50 टक्क्यांच्या खाली आल्यानेच शासनाने दुष्काळी तालुके जाहीर केले आहेत. शेतातील उभी पिके आणि कपाशी जळू नये यासाठी आम्ही जलसंपदा मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गिरणा, वाघूर आणि हतनूर प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. नशिराबाद, असोदा व भदलीकडे 1 आवर्तन सोडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणाची 3 आवर्तने आणि शेती व चाऱ्यासाठी 35 दिवसांचे विशेष आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.
नुकसान भरपाईचे पैसे नक्की मिळणार
दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना प्राथमिक मदत मिळाली असली तरी पीक नुकसान भरपाईची रक्कम अद्याप खात्यात जमा झालेली नाही, याची आम्हाला जाणीव आहे. या प्रक्रियेला थोडा विलंब होत असला तरी हे आपले सरकार असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
———————————————————————————-
हेही वाचा…
पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी