![]()
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी रात्री आकस्मिकपणे ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी राबविण्यात आली. या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी रात्री दहा वाजता सुरू करण्यात आले. ते शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती. शहरातील ८ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ९ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या मोहिमेत ५१ अधिकारी आणि ३०६ पोलीस अंमलदारांच्या फौजफाटा तैनात होता. नियम मोडून शहरात वावरणाऱ्या ४ तडीपारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये केडिया नगरचा विक्की उर्फ गणेश मधुकर खडसे (३०), महाजनपुरा येथील विशाल गंगानाथ तायवाडे (३०), शांती नगरचा महेंद्र उर्फ तुफान भगवान चंडकापुरे (३२) आणि वल्लभ नगर येथील मयुर राजेश चाळीसगावकर (३३) या चौघांचा समावेश आहे. याचवेळी शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २ जणांवर आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या १६ जणांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील (हिस्ट्रीशीटर) एकूण ५४ गुन्हेगार आणि ४ निगराणी बदमाशांची तपासणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या ८ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली, तर ९ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी देखील करण्यात आली. शहरात गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा वेळोवेळी राबवल्या जातील, असा इशारा पोलीसांकडून देण्यात आला आहे. ३७५ वाहनांची तपासणी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ३७५ वाहनांची कसून तपासणी केली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर ३८ वाहनधारकांकडून २,९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या १३ वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली.
Source link
शहर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार पकडले:शस्त्रे आणि दारू जप्त, मध्यरात्री केली कारवाई