Headlines

शास्त्रीय गायक सचिन नेवपूरकरला अटक: विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल; जामीनही फेटाळला



‘ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेतील संगीत शिक्षक आणि शास्त्रीय गायक सचिन नेवपूरकर (वय 47, रा. शिवनेरीनगर) याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिकवणीदरम्यान जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, द्विअर्थी संभाषण करणे, मद्यप्राशनाचा

.

जवाहरनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून, 7 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. नेवपूरकरने केलेला जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अल्पवयीन असताना जवळीक वाढवण्याचे प्रकार

सध्या मुंबईत शिकत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने 3 नोव्हेंबर रोजी ही तक्रार नोंदवली आहे. वडिलांच्या नोकरीमुळे तिचे सुरुवातीचे शिक्षण राज्याबाहेर झाले. कुटुंबीयांशी असलेली जुनी ओळख लक्षात घेऊन, 2020 मध्ये तिला पूर्णवेळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले होते. शिवनेरीनगर परिसरातील नेवपूरकरच्या संस्थेत तिचे शिक्षण सुरू झाले आणि पहिले वर्ष व्यवस्थित पार पडले. मात्र, एप्रिल 2022 मध्ये ती साडेसतरा वर्षांची असताना, म्हणजेच अल्पवयीन असताना, नेवपूरकरने तिच्याशी जवळीक वाढवण्याचे प्रकार सुरू केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

अश्लील वर्तन करत संबंधांची मागणी

सरावाच्या निमित्ताने एकटे बोलावून स्पर्श करणे तसेच द्विअर्थी बोलणे असे प्रकार वाढले. पुण्यातील शाखेत आणि छत्रपती संभाजीनगरमधील दर्गा चौक भागातील घरी नेऊन त्याने अश्लील वर्तन करत शारीरिक संबंधांची मागणी केली. आपल्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. पुढे तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मद्य घेण्याचा आग्रह, शिव्या शिकवण्याचा प्रयत्न

रेकॉर्डिंगसाठी मुंबईत गेले असताना 18 व्या वाढदिवसापूर्वीच मद्य घेण्याचा आग्रह त्याने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर 2022 मध्ये तिला पुण्यातील क्लासवर नेऊन, फ्रेंडशिप डे साजरा करूया आणि मला मित्र समज, असे म्हणत फ्रेंडशिप बँड बांधला. दर्गा चौक येथील घरी जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही झाला, तसेच तो शिव्या शिकवण्याचा प्रयत्न करत असे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

इतर विद्यार्थिनींचेही असेच आरोप

दरम्यान, नेवपूरकरने केलेला जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष न्यायाधीश शिल्पा एस. तोडकर यांनी 20 नोव्हेंबर रोजी हा निर्णय दिला. तपासादरम्यान इतर काही विद्यार्थिनींनीही असेच आरोप केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून आरोपपत्र दाखल झालेले नाही. जामीन मंजूर झाल्यास पीडिता आणि साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो तसेच पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली.

आरोपीतर्फे ॲड. एन. एस. घाणेकर, शासनातर्फे ॲड. डी. के. नागूला तर पीडितेच्या वतीने ॲड. वायाळ-काळे यांनी बाजू मांडली. गुन्हा नोंद झाल्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी अटक करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *