Headlines

शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती:म्हणाले- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?




काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर आधारित ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्वाच्या विचारांचा अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या महिला नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांच्या या पुस्तकाची पाने थेट कॅमेऱ्यांसमोर फाडून तीव्र निषेध नोंदवला. “काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात असताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत? सावरकरांचा हा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेतच फाडल्या पुस्तकाच्या प्रती शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन. सी., तसेच नेते संजय निरुपम आणि किरण पावसकर यांच्या उपस्थितीत ही वादळी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शीतल म्हात्रे यांनी पुस्तकातील पान क्रमांक 201 आणि इतर भागांचा संदर्भ देत, या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानजनक मजकूर छापल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेच्या शेवटी उपस्थित सर्व महिला नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने टराटरा फाडून काँग्रेसच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला. बाळासाहेबांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची करून दिली आठवण यावेळी बोलताना शिवसेना नेत्यांनी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर चौफेर टीका केली. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या तुरुंगात तब्बल 11 वर्षे काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगली, अनन्वित अत्याचार सहन केले आणि आपल्या लेखणी व काव्यातून हिंदुत्वाचा विचार जगभर पोहोचवला, त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने ‘माफीवीर’ म्हणून हिणवतात, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली. बाळासाहेबांची ती शिवसेना कुठे गेली? काँग्रेसच्या 65 वर्षांच्या सत्ताकाळात सावरकर, हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच द्वेष करण्यात आला. पूर्वी मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन केले होते. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी आज उद्धव ठाकरे गट सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला असल्याचा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी नेते किरण पावसकर आणि संजय निरुपम यांनीही काँग्रेसच्या या कृत्याचा समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता आपले मौन सोडून सोनिया गांधींच्या पुस्तकातील या मजकुराचे ते समर्थन करतात की निषेध, हे महाराष्ट्राला सांगावे, असे आव्हान शिवसेनेतर्फे देण्यात आले आहे. ही सतत बातमी अपडेट होत आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *