![]()
श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाईंचे वंशज पाठक परिवाराच्या वतीने दरवर्षी महालक्ष्मी उत्सव (गौरी गणपती) अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाच्या महालक्ष्मी उत्सवात पाठक कुटुंबाने पुरातन आणि अत्यंत उपयुक्त अशा ‘आयुर्वे
.
संत बहिणाबाईंचे देवघर असलेल्या ऐतिहासिक राम मंदिरातील घरात या देखाव्याची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक जीवनशैलीत मानवी आरोग्यासाठी औषधी वनस्पती किती महत्त्वाच्या आहेत, हे दर्शवण्यासाठी तुळस, बेल, जांभूळ, कोरफड, ओवा, हळद, गवती चहा, आले, शतावरी आणि अडुळसा अशा विविध औषधी वनस्पतींची कुंडीतील रोपे येथे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक रोपाजवळ त्याच्या पांढऱ्याशुभ्र फलकावर त्या वनस्पतीचे शरीराला होणारे फायदे सविस्तर लिहून जनजागृती करण्यात आली आहे.
महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घरात अत्यंत कल्पक आरास, दिव्यांची लखलखती रोषणाई, आकर्षक तोरणे आणि सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. देवीच्या मुखवट्यांना पारंपरिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी व भरजरी वस्त्रांनी नटवून त्यांची स्थापना केली आहे. हा मनमोहक आणि अभ्यासपूर्ण देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
पाठक कुटुंबातील अनेक सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहेत. मात्र, रामनवमी, महालक्ष्मी किंवा इतर सणावाराला सर्वजण गावी एकत्र येतात.
अनेक वर्षांची ही धार्मिक आणि कौटुंबिक परंपरा त्यांनी आजही उत्साहाने जपली आहे. पाठक परिवाराच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देखाव्यात प्रबोधनात्मक फलक “तुळस करी शरीराची वृद्धी, पुदिना करी पोटाची शुद्धी, अडुळसा देई श्वासाला आराम…’ अशा आशयाचे प्रबोधनात्मक फलक या देखाव्यात लावले आहेत. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च’ म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवणे आणि आजारी व्यक्तीला रोगमुक्त करणे हाच आयुर्वेदाचा मुख्य उद्देश असल्याचे संदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.