![]()
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती नसलेला इतिहास अभ्यासण्याचे आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश आपल्या सर्वांमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील आपण सर्वच छत्रपतींचे वंशज आहोत. ही आपल्या महाराष्ट्र आणि देशाची महान परंपरा आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील ठराविक घटनांचा माहिती असलेला इतिहास आपल्यासमोर नेहमी येतो, परंतु यापलीकडे असणारा इतिहास फार मोठा आणि प्रेरणादायक असून, तो जाणून घेणे आवश्यक आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे थोर कार्य जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, विश्वस्त राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संगीता जगताप आणि सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण देताना सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात इराणने अमेरिकेला चांगली टक्कर दिली, तर रशियालाही एकतर्फी युद्ध जिंकता आले नाही. याउलट, छत्रपतींनी एकाचवेळी तीन लढाया अत्यंत जोखमीने आणि उत्तम नियोजनाने लढल्या. या लढायांसाठी त्यांनी जनतेवर कोणताही अतिरिक्त कर लादला नाही किंवा कोणतीही अतिरिक्त वसुली केली नाही, जे आजच्या काळात शिकण्यासारखे आहे. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून कर्तृत्वावर आधारित जबाबदाऱ्या दिल्या. गडावरील बाजारपेठेची निर्मिती, पाण्याचे तळे उभारणे ही त्यांची कौशल्ये अभ्यासण्यासारखी आहेत. महाराजांच्या गडकिल्ल्यांची दखल युनेस्कोने घेतली असून, त्यामुळे त्यांचा इतिहास जगभरात पोहोचण्यास मदत झाली आहे. महाराजांचे आरमार आणि त्याचे व्यवस्थापन कौशल्य कमालीचे होते, ज्याचा सखोल अभ्यास व्हायला हवा. महाराजांचे गुण आपण रोजच्या जीवनात आणून वैभवशाली इतिहास जगायला हवा, असे आवाहनही भोसले यांनी केले.
Source link
शिवाजी महाराजांचा अज्ञात इतिहास अभ्यासा:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन