Headlines

दगडूशेठ ट्रस्टकडून 100 दिवसांत 1 कोटी लीटर पाणी वाटप:पुरंदरमधील दुर्गम भागांत दररोज 1 लाख लीटर पाणीपुरवठा




पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरंदर तालुक्यातील दुर्गम वनक्षेत्र, डोंगराळ भाग आणि वाड्या-वस्त्यांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने पाणीपुरवठा केला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ट्रस्टने मार्च ते जून या १०० दिवसांत तब्बल १ कोटी लीटर पाण्याचे वितरण केले आहे. ट्रस्टच्या स्वतःच्या दोन टँकरद्वारे दररोज १ लाख लीटर पाणी वितरित करण्यात आले. यामुळे तहानलेल्या माणसांसह वन्यजीव, पक्षी आणि पाळीव जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाने २०१४ पासून टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. महामार्गावरील झाडांना पाणीपुरवठा करून वृक्षसंवर्धनालाही हातभार लावला जातो, तसेच गावकऱ्यांची तहान भागवल्यानंतर उरलेले पाणी शिवारातील तळ्यांमध्ये सोडले जाते. पुरंदर तालुक्याचा दक्षिण-पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. यंदाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. ट्रस्टने वाल्हे गावच्या पूर्वेकडील गायकवाडवाडी, मुकादम वाडी, अंबाजीचीवाडी, राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी, चव्हाणवस्ती, पडळकरवस्ती, करेवस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान, चतुर्मुख महादेव मंदिर वारवडी, नारायपूर, पूर-पोखर, दौंडज, नावळी, कडेपठार देवस्थान, थाप, वारवडी, दरेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी पोहोचवले. या पाणीपुरवठ्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल, दुभती जनावरे आणि रानातील जीवांना जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांसाठीही ही मदत मोठा आधार ठरली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवासोबत वन्यजीवांचे अस्तित्वही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची आणि मेंढपाळांची पाण्याची चिंता काही अंशी कमी झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *