Headlines

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करा:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत उत्पादक, वितरकांना निर्देश




एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाण्यांची टंचाई भासू नये, यासाठी मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवणूक करावी, असेही ते म्हणाले. कृषी मंत्री भरणे हे शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय येथे आयोजित बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांच्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. सर्व बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांनी समन्वयाने काम करावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महासंचालक राहुल माहिवाल, राष्ट्रीय सूचना केंद्राचे वरिष्ठ संचालक अविनाश पेडगावकर, संचालक विस्तार व प्रशिक्षण रफीक नाईकवाडी, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंबादास मिसाळ, कृषी उपसंचालक बियाणे व नोडल अधिकारी डॉ. प्रिती सवाईराम उपस्थित होते. तसेच, सियाम, मासा व माफदा बियाणे उत्पादक, विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. जयस्वाल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी काम करावे. बोगस बियाण्यांवर आळा घालून शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘साथी पोर्टल’चा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, उच्च उत्पादनक्षम वाणांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे देशाच्या बियाणे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘साथी पोर्टल’ हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, कायदेशीर अडचणीच्या वेळी उत्पादक व विक्रेत्यांना पुरावा म्हणून ते उपयोगी ठरेल. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात सुनील बोरकर यांनी माहिती दिली की, केवळ उच्चतम प्रतीच्या बियाण्यांमुळे पीक उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘साथी पोर्टल’ विकसित केले आहे. खरीप हंगाम २०२३ पासून या पोर्टलची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बियाणे उत्पादक व विक्रेत्यांच्या संघटनेच्या सूचनेनुसार पोर्टलमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले असून, या पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *