Headlines

शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर महामोर्चा; प्रशासन हादरले:एकरी 300 ते 1 हजारांचा विमा देत फसवणूक; सरकारविरोधी घोषणा‎




तुटपुंजी विमा रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली असून, एकरी ३०० ते एक हजार रुपयांचा विमा देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली. भेटी घेत व्यथा मांडली. तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून शुक्रवारी (दि.१५) ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाला हादरा दिला. या महामोर्चाचे नेतृत्व पंढरपुरी बैलजोडीने करण्यात आले. चालू कर्जदारांना अजून न दिलेला ५० हजारांचा प्रोत्साहन निधी, कर्ज माफीचे भिजत घोंगडे या सर्व बाबींचा निषेध केला. पीकविमा कंपनी व सरकारने याची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी रणरणत्या तप्त उन्हात दुपारी एक वाजता ट्रॅक्टर महामोर्चाची सुरूवात झाली. दर्यापूर रोड टी पॉइंट, अकोला रोड रेस्ट हाऊस या दोन्ही ठिकाणाहून सुरुवात झाली. मोर्चा नगरपरिषद जवळून एकाच मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महामोर्चाचे नेतृत्व जितापूर खेडकर येथील शफू शेख यांच्या पंढरपुरी बैलजोडीने केले. मोर्चात प्रगती शेतकरी मंडळ व विविध शेतकरी संघटनांचा सहभाग होता. या वेळी राजू वानखडे, विनायक गुल्हाने, मुन्ना नाईकनवरे, अभी पोळकट, कृष्णा गावंडे, भैय्या ठोकळ, सागर मानकर, राहुल वानखडे, शुभम जवंजाळ, कुलदीप जामनिक, प्रफुल्ल मालधुरे, प्रशांत गावंडे, नितीन कोल्हे, विजय मोहोड, हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *