![]()
संगमनेर तालुक्यातील विजेच्या लपंडावाविरोधात आणि शेतकऱ्यांना हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळावी, या मागणीसाठी काढण्यात आलेला शेतकरी जनआक्रोश मोर्चा मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. प्रांताधिकारी अरुण उंडे कार्यालयात उपस्थित नसल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी कार्यालयात प्रवेश करून खुर्च्यांची फेकाफेक केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचीही धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात विजेचा अनियमित पुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी येत आहेत. धरणांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. परिणामी पिके सुकत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू असतानाच काही आंदोलक कार्यालयात शिरले. प्रांताधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलासमोरील खुर्च्या उचलून फेकण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. खरीप शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत व रोजगार दिला पाहिजे. आमच्याकडे पाणी आहे; मात्र ते उचलण्यासाठी वीज नाही. शेतातील पिके जळत आहेत. पाणी वाहून जात आहे आणि ते कुठे चालले आहे, हे कळत नाही. पाणी उचलण्याची परवानगी असूनही वीज मिळत नाही. सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा जाहिरातबाजीच्या फलकांमध्ये व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली. अजय फटांगरे, अमोल शेरकर, राम कातोरे, किसन पानसरे, कोमल उगले, भाऊराव रहाणे, प्रियांका गडगे, संदीप थिटमे, कल्याणी राहणे यांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
Source link
संगमनेरात वीज-पाण्यासाठी शेतकरी आक्रमक:प्रांताधिकारी कार्यालयातील खुर्च्या फेकल्या