Headlines

संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद संपला:'मला उमगलेला संघ' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाऊ तोरसेकरांचे प्रतिपादन




ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रतिपादन केले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा भारतीय मातीतील असल्याने तो जनमानसात रुजला आहे, तर मार्क्सवादी विचार आयात केलेला असल्याने आणि कालबाह्य झाल्याने तो संपला आहे. ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.पुण्यातील टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि ‘भारतीय विचार साधना’ (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. संघाने १०० वर्षे पूर्ण केली असताना कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले की, कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी, आता ही संपूर्ण चळवळ केवळ ‘पुस्तकी’ राहिली आहे. याउलट, संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहेत आणि संघ केवळ ज्ञानी लोकच नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे ते डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होते. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर त्यांना संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा त्यांना संघाकडे आकर्षित करणारा ठरला. ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे म्हणाले की, संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या ‘रॉयल ऑर्केस्ट्रा’मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे ‘काव्यगत न्याय’ असल्याचे त्यांनी नमूद केले.अ‍ॅड. क्षितीज गायकवाड यांनी सांगितले की, बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मनात संघाविषयी चुकीची मते होती. मात्र, गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर त्यांना खरा संघ उमजला. ‘भारतीय विचार साधना’ संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचितांसाठी लढा दिला. ते कधीही ‘डावे’ नव्हते. ते आज हयात असते, तर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी उभे राहिले असते. दुर्दैवाने आजच्या चळवळीतील लोकांनी या महापुरुषांना नीट वाचलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *