![]()
“दगडावरचे हातांचे ठसे घेऊन ते आधार कार्डला लिंक केले जातील, हा चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध अत्यंत मोठा आहे. अशा प्रकारचा शोध आतापर्यंत कोणीही लावला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करून चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधनातील ‘नोबेल पुरस्कार’ द्यायला हवा,” असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची खिल्ली उडवतानाच, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई, संसदेतील विधेयके आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याच्या निर्णयावर जोरदार प्रहार केला. ‘चंद्रकांत दादांना विज्ञानाचे नोबेल आणि जागतिक विद्यापीठाचे कुलगुरू करा’ दिल्लीतील आंदोलनात वापरलेल्या दगडावरील फूटप्रिंट्स (हाताचे/पावलांचे ठसे) आधार कार्डशी लिंक होतील, या चंद्रकांत पाटलांच्या दाव्याची संजय राऊतांनी चांगलीच खिल्ली उडवली. राऊत म्हणाले, “चंद्रकांत दादा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. दगडावरचे ठसे आधारशी लिंक करायचे, हा शोध ऐकून ज्यांनी आधार कार्ड निर्माण केले, ते नंदन निलेकणी दोन दिवस कोमात गेले असतील. त्यांनाही सुचेनासे झाले असेल की काय करावे!” “यापूर्वी दादांनी ‘छातीवर दगड ठेवून’ विधान केले होते आणि आता रस्त्यावरचे दगड घेऊन बोलत आहेत. त्यांचा दगडाशी फार जवळचा संबंध आहे. पक्षात जे ‘दगड-धोंडे’ आले आहेत, त्याचा हा परिणाम दादांवर दिसतोय. त्यांना विज्ञानाचे नोबेल दिलेच पाहिजे, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल,” असा उपहास त्यांनी केला. अमित शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणे हे नैतिक अध:पतन पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाण्याला संजय राऊत यांनी तीव्र विरोध दर्शवला. “ज्या लोकमान्य टिळकांनी स्वाभिमानाने आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले, त्यांचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे ‘व्यवस्थापकीय संचालक’ (MD) अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट कोणी घातलाय? त्यांच्या बुद्धीची कीव येते. हे नैतिक अध:पतन आहे.” “जंतरमंतरवर हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरुणांना ज्यांच्या आदेशाने ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, त्या अमित शहांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे आणि अश्रूंचे शिंतोडे आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते टिळक पुरस्कार देणे पुणेकर जनता मान्य करणार नाही. पुण्यात आंदोलनाची परवानगी नाकारणे ही दडपशाही आहे.” वंदे मातरमवर अधिवेशन घेणारे पंतप्रधान विधेयकावेळी गायब संसदेत चर्चेविना विधेयके मंजूर केल्याच्या आरोपांवर आणि सरकारच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, “अँटी पेपर लीक विधेयक आणि ‘वंदे मातरम’ विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली; मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह आम्ही आमचे मत मांडले. पण जेव्हा हे विधेयक आले, तेव्हा एरवी परीक्षांवर आणि राष्ट्रभक्तीवर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री संसदेत उपस्थित नव्हते. काँग्रेसवर टीका करण्यासाठी तासभर भाषण करणारे पंतप्रधान महत्त्वाच्या विधेयकावेळी संसदेत नसतात, हे कसले राष्ट्रभक्तीचे ढोंग आहे?” अभिजीत दीपके आंदोलनावर ते म्हणाले, “आंदोलन आता संपले असून अभिजीत दीपके आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी गेले आहेत. यामध्ये कोणीही राजकीय पोळी भाजू नये किंवा राजकारण करू नये, हीच उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका आहे.” दुसरीकडे, जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री भेटीवर त्यांनी म्हटले की, “इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांची निवड कलेक्टरने बेकायदेशीरपणे रद्द केली होती. त्या अन्यायाविरुद्ध जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर त्या बेकायदेशीर निर्णयाला स्थगिती मिळाली असेल, तर तो आनंदाचा भाग आहे. त्याचा राजकीय अर्थ काढू नये.” “राहुल गांधी कधीही असंसदीय शब्द वापरत नाहीत. भाजपच्या लोकांना काय वाईट वाटेल सांगता येत नाही. त्यांच्यासाठी आता आरएसएसच्या बौद्धिक वर्गाकडून एक नवा शब्दकोश तयार करून घ्यावा लागेल. आम्हाला हक्कभंग प्रस्तावाची कोणतीही चिंता नाही.” हेही वाचा.. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू:4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू
भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 4 ते 5 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला:दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधाबद्दल विज्ञानाचे नोबेल द्या, शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देण्यासही विरोध