![]()
पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमध्ये मराठवाड्यातील बैलांवरील ४ महिन्यांची अघोषित बंदी अखेर मोडीत निघाली. बंदी हटल्यानंतर झालेल्या पहिल्याच अत्यंत चुरशीच्या शर्यतीत छत्रपती संभाजीनगरच्या ‘लखन’ने सांगलीत अवघ्या २६ सेकंदांत मैदान पार करत प्रथम क्र
.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गारळेवाडी येथे ‘वनश्री केसरी’ या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील नामांकित बैल उतरले होते. मात्र, ‘लखन’ने मुंबईचा मेहरबान, ठाण्याचा मथूर, मल्हार, घोट सर्जा, सर्जा, रुद्रा आणि पक्षा यांसारख्या दिग्गज बैलांना मागे टाकत मैदान गाजवले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या नेत्रदीपक कामगिरीनंतर शर्यतप्रेमींनी लखनला ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ ही नवी ओळख दिली असून त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा निर्माण झाला आहे.
लखन खऱ्या अर्थाने ‘मराठवाडा एक्स्प्रेस’
लखनने मिळवलेल्या या विजयामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. लखनच्या जिद्दीमुळे बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत छत्रपती संभाजीनगरचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. तो आता खऱ्या अर्थाने ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ ठरला आहे. आणखीही शर्यती जिंकण्याचा मला विश्वास वाटतो. -सर्जेराव चव्हाण, लखनचे मालक
धमक्यांना न जुमानता मैदानात उतरला अन् जिंकला
पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातील बैल सातत्याने बाजी मारत असल्याने निर्माण झालेल्या वादातून काही शर्यतींमध्ये त्यांच्यावर बंदी घातली होती. ही बंदी मोडून काढण्यासाठी सर्जेराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला. ४ महिन्यांनी लखनला धावण्याची संधी मिळाली. त्याने मैदानात उतरू नये म्हणून बॅनरवर छेडछाड करून धमक्या देण्यात आल्या होत्या. दबावाला न जुमानता लखन मैदानात उतरला आणि विरोधकांना चोख उत्तर दिले.