Headlines

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील:नांदेड मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळावे




कुठे वंदे मातरम‌ तर कुठे टिपू सुलतान यांच्या फोटोबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. निवडणुका आल्या की असे मुद्दे उपस्थित करून निवडणुका जिंकायची हे भाजपचे सूत्र आहे. असे प्रश्न उचलण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईबद्दल भाजपने बोलावे, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. बुधवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगावमध्ये उपमहापौरांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे वाद उद‌्भवला होता. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता इम्तियाज जलील म्हणाले, ‘ज्या संविधानावर आपला भारत देश जिवंत आहे, चालत आहे त्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये डॉ. बाबासाहेबांनीच राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आहेत. ही मूळ प्रत लोकसभेत आहे. हिंमत असेल तर या संविधानातून यांचे फोटो काढून दाखवावे,’ असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. नांदेड, धुळे व सोलापूर मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळवण्यासाठी हायकोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला. राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा आहे भर राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा भर आहे. सोलापूर, नांदेड, मालेगाव, संभाजीनगर या चार शहरांत कार्यकारिणीची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांच्याकडे आहे. ही निवडही तेच करतील. जे पक्षातून गेले त्यांना पुन्हा घ्यायचे किंवा नाही याचा निर्णयही ओवेसीच घेतील. त्यामुळे याबाबत निर्णय आपण घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. एक टक्का तरी निधी शिक्षणासाठी खर्च व्हावा नाशिकच्या कुंभमेळाव्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, त्याला आमचा विरोध नाही. पण त्यातील एक टक्का तरी निधी शिक्षणासाठी खर्च व्हावा. प्रत्येक मनपाने एक शाळा व एक दवाखाना आमच्या पक्षाला दत्तक द्यावा व एक वर्षानंतर त्याचे रिझल्ट पाहावे. इतर पक्षांनीही अशी जबाबदारी घ्यावी. या विकासकामात आम्ही नक्कीच पुढे असू, असा दावाही त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *