![]()
हर एक दुआ उल्फ़त हो रही है, फूलों पर भी रहमत मगर हो रही है। चला है हवाओं में कैसा ये जादू, कि हर सांस अब तो इबादत हो रही है… गुलाबाच्या पाकळ्यांचा मंद सुगंध, संदल आणि लोबानचा दरवळणारा धूर अन् वातावरणात गुंजणारे अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मदचे सूर..
.
एका महिन्याची मेहनत फळास; १० लाख भाविकांची शांततेत जियारत
देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी दर्गा कमिटीने तब्बल एक महिन्यापासून नियोजन सुरू केले होते. प्रेषित पैगंबरांच्या पवित्र निशाण्यांच्या जियारतसाठी अवघ्या २४ तासांत १० लाख भाविक आले. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत जियारत केली, हेच या भूमीचे मोठेपण आहे. -शारफुद्दीन मोहंमद रमजानी, (अध्यक्ष, दर्गा व्यवस्था समिती, खुलताबाद)
प्रेषित पैगंबरांच्या ‘मुए मुबारक’ व ‘पैरहन मुबारक’च्या जियारतने गलबलले १० लाख डोळे
सध्या पवित्र श्रावण मास सुरू आहे. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळचे १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात आणि खुलताबादच्या जागृत श्री भद्रा मारुती मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला खुलताबादच्या संतांच्या दरबारात १० लाख मुस्लिम बांधव नतमस्तक झाले आहेत. एकाच मार्गावर एका हातात कावड घेऊन चालणारे शिवभक्त, भद्रा मारुतीच्या दर्शनाला जाणारे भाविक आणि दुसऱ्या हातात चादर घेऊन जाणारे उरुसाचे जायरीन हे विहंगम दृश्य गंगा-जमुनी तहजीबचे रूप ठरले. स्थानिक हिंदू-मुस्लिम गावकऱ्यांनी पाणीवाटप, चहा आणि मदतीचे हात पुढे करत एकमेकांचे सण ज्या आपुलकीने साजरे केले त्यामुळे सामाजिक सलोख्याचा सुगंध अधिकच दरवळला.
विविध उपक्रम
ऑल इंडिया कव्वाली मुकाबला, कुस्तीचे सामने, महफिल-ए-चिरागाँ, सेमिनार, शब-ए-बदावा, मुशायरा आणि किरात स्पर्धा.
एकीकडे हर हर महादेव, जय श्रीराम, दुसरीकडे जियारत
१० लाख समाजबांधव आपल्या दारात आले होते. त्यांची अहोरात्र सेवा करणे हे आमचे कर्तव्य होते. अवघ्या १० वर्षांच्या लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा ७०० स्वयंसेवकांनी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि रांगांची चोख व्यवस्था सांभाळली. गावकऱ्यांची एकजूट आणि बंधुभाव या सोहळ्याचे खरे वैभव ठरले. -ॲड. कैसरुद्दीन (सदस्य, सरकारमान्य उर्स व्यवस्था समिती)
१० ते ७० वयोगटातील ७०० स्वयंसेवकांनी सांभाळली जबाबदारी
उरुसामुळे लाखो भाविक रस्त्यावर होते, तरीही पूर्वनियोजित वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असलेली पाळत आणि पोलिस बंदोबस्तामुळे संपूर्ण सोहळा अतिशय शांततेत पार पडला. कुठेही वाहतूक कोंडी अथवा गैरप्रकार घडला नाही. -अपराजिता अग्निहोत्री, (सहायक पोलिस अधीक्षक, कन्नड विभाग)