Headlines

सटाण्याच्या बायपासला केंद्राची मंजुरी:खासदार डाॅ. शाेभा बच्छावांची माहिती; साक्री-शिर्डी महामार्गाच्या दुरुस्तीला गती देण्याची ग्वाही‎




शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतीक्षित वळण रस्त्याला (बायपास) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्याला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. बागलाण तालुक्यातील नागरिक, विशेषतः आदिवासी गाव-पाड्यांमधील नागरिकांशी संपर्क व समन्वय राखण्यासाठी सटाण्यात खासदार डॉ. बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार बापुसाहेब चौरे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत आहीरे होते. शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या दुरुस्तीचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असून, रस्त्याची दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा करून कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले. केळझर व हरणबारी कालव्यांच्या दुरुस्तीसाठीही पाठपुरावा सुरू असून, तालुक्यातील पाझर तलावांमधील गळती रोखणे, आवश्यक दुरुस्ती करणे व जलसाठ्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. भविष्यातील सिंचनाच्या गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनातून सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी खासदार बापुसाहेब चौरे, डॉ. दिनेश बच्छाव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, सचिन सावंत, प्रल्हाद पाटील, रमेश कहांडोळ, अनिल पाटील, केशव मांडवडे, प्रशांत पाटील, मुन्ना रब्बानी, भारत काटके, मनोज सोनवणे, प्रकाश देवरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर कदम यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खैरनार यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *