Headlines

खंडाळा येथे वारकऱ्यांचा महासागर; 281 व्या सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ:संत शंकरस्वामी महाराजांच्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी‎




टाळ-मृदंगाचा गजर… भगव्या पताका… डोक्यावर तुळशी-कलश आणि रस्त्याच्या दुतर्फा उसळलेला भाविकांचा जनसागर श्रीक्षेत्र खंडाळा येथे सोमवारी श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थान शिऊर फडाच्या २८१ व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी निघालेल्या दिंडी सोहळ्याने संपूर्ण खंडाळा भक्तिरसात न्हाऊन निघाले. मुख्य चौकापासून गावातील रस्त्यांवर हजारो भाविकांची गर्दी उसळल्याचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले गेले. संत निळोबारायांचे शिष्य श्री संत शंकर स्वामी महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा यंदा खंडाळ्यात पोहोचली आहे. १७ ते २५ ऑगस्टदरम्यान चालणाऱ्या या सप्ताहासाठी तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सात दिवस अखंड हरिजागर,भजन, कीर्तन, प्रवचन आणि अन्नदानाचा महाजागर रंगणार आहे. सप्ताहाच्या सांगतेला २५ ऑगस्ट रोजी महंत सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. त्यासाठी ११ हजार १११ किलो साखर, १४ मोठ्या चुलांगणांची व्यवस्था आणि एकाच वेळी पाच हजार लिटर आमटी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थ व सप्ताह समितीने सूक्ष्म नियोजन केले आहे. आकाशातून दिसला भक्तीचा महासागर खंडाळ्याच्या मुख्य चौकात दिंडी पोहोचताच रस्ते भाविकांनी अक्षरशः फुलून गेले. पांढरे शुभ्र पोशाख, भगव्या टोप्या-पताका आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी वारकरी यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले. ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य सप्ताहाच्या पहिल्याच दिवसाची भव्यता सांगणारे ठरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *