Headlines

'सर्वे भवन्तु सुखिनः' हा भारतीय विचार श्रेष्ठ:पुण्यात संघ शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखांचे प्रतिपादन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या पाश्चात्य नियमापेक्षा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा भारतीय विचार श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. सध्या जगात ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मुळे अनागोंदी निर्माण झाली असून, या संघर्षाच्या काळात ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा सर्वसमावेशक विचार जगभर नेण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. या विचारातच सर्व जीवांच्या सुख-शांतीची खरी कामना दडलेली आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुणे महानगरातील वडगावशेरी भागातील वैचारिक, शैक्षणिक आणि विधी क्षेत्रातील नागरिकांसाठी रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खराडी येथील ढोले पाटील महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भारत भूषण प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संघाच्या स्थापनेमागील मूळ उद्देश आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचा आढावा घेताना भारत भूषण यांनी सांगितले की, संघाचे संघटन हे केवळ गर्दी जमवणे नसून, दैनंदिन शाखांच्या माध्यमातून सातत्याने व्यक्तिनिर्माणाचे कार्य करणे हे आहे. डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. देशाला परमवैभवाप्रत न्यायचे असेल, तर समाजातील सज्जन शक्तीने केवळ प्रेक्षक न राहता संघकार्यात सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी संघाच्या विविध आयामांची माहिती देऊन समाजातील विविध स्तरांना जोडण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संजय कुलकर्णी यांनी शताब्दी वर्षानिमित्त संघाने हाती घेतलेल्या ‘पंच परिवर्तन’ अभियानाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी (स्वबोध), पर्यावरण आणि नागरिक कर्तव्य या पाच मूल्यांची समाजात रुजवणूक होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भारत भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही गौरव केला. आत्मग्लानी आलेल्या समाजात शिवरायांनी स्वाभिमान जागृत केला. परकीय सत्तांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो, हा विश्वास शिवरायांनी संपूर्ण भारतवर्षात निर्माण केला. त्यामुळे शिवरायांचे स्वराज्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्या विचाराने संपूर्ण भारतवर्षात स्वाभिमानाची चेतना निर्माण केली, असे प्रतिपादन भारतभूषण यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *