Headlines

कन्नडला रिक्त पदांचे ग्रहण:पशुसंवर्धन कार्यालयाची दुरवस्था, संरक्षण भिंत नाही, पावसामुळे कार्यालयास गळती‎




कन्नड तालुक्यातील पशुधनाची काळजी घेणाऱ्या सहायक पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची सध्या दुरवस्था झाली आहे. चाळीसगाव रस्त्यावर सुमारे तीन एकर प्रशस्त जागा उपलब्ध असतानाही या कार्यालयाचा कारभार अतिशय तोकड्या व जीर्ण इमारतीतून चालविला जात आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी छतातून पाणी गळत असून भिंतींना ओल आल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यातच संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी अनेकजण अस्वच्छता करत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. कार्यालयाला संरक्षक भिंत नसल्याने या परिसरात अवैध वाहनतळ, कचरा डेपो आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या कन्नड तालुक्यात ऐंशी टक्के समाज शेतीवर आधारित असून तालुक्यात तब्बल ६७ हजार गायवर्ग आणि ७७ हजार १५० शेळ्या-मेंढ्यांचे पशुधन आहे. या जनावरांवर उपचार करणे, प्रतिबंधात्मक लसीकरण, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी या विभागावर आहे; मात्र अपुऱ्या सुविधांमुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि पर्यवेक्षक ही महत्त्वाची पदे अपूर्ण आहेत. पशुधन पर्यवेक्षक दीर्घ रजेवर असून वरिष्ठ लिपिक, शिपाई, परिचर व ड्रेसर यांची पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत केवळ एक परिचर कार्यरत आहे. तालुक्यातील नागद, चिंचोली लिंबाजी, पिशोर, जैतखेडा, चिकलठाण, देवगाव रंगारी व औराळा या श्रेणी-१ च्या आठही पशु दवाखान्यांमधील पशुवैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असून तेथे अतिरिक्त कार्यभारावर काम भागवले जात आहे. तसेच श्रेणी-२ च्या १० पशु दवाखान्यांपैकी ८ ठिकाणी पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत. नवीन पुनर्रचना आणि नामांतर या संदर्भात सहायक आयुक्त डॉ. मिलिंद देशमुख यांनी सांगितले की, कार्यालयाची नवीन पुनर्रचना होत असून आता सर्व १८ पशुवैद्यकीय संस्थांमध्ये पदवीधर वर्ग-१ अधिकारी उपलब्ध होतील. तसेच या कार्यालयाचे तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय असे नामांतर होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *