![]()
नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा कारभार मोठ्या विसंगतीतून सुरू असल्याचे माहिती अधिकारातून (RTI) उघड झाले आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शेकडो कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील एकूण 33 पैकी तब्बल 25 पदे रिक्त आहेत. केंद्रात दरवर्षी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2023-24 मध्ये 107, 2024-25 मध्ये 88 आणि 2025-26 मध्ये 132 कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमांची संख्या सातत्याने मोठी असताना, एवढ्या कमी मनुष्यबळावर हे सर्व कसे पार पडते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्राकडे निधीची कमतरता नाही. 2023-24 मध्ये 9.74 कोटी रुपये (खर्च 7.41 कोटी), 2024-25 मध्ये 9.59 कोटी रुपये (खर्च 8.82 कोटी) आणि 2025-26 मध्ये 11.42 कोटी रुपये (अंदाजे खर्च 11.30 कोटी) उपलब्ध होते. गेल्या तीन वर्षांत 30 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसणे, ही एक मोठी विसंगती आहे. केंद्रात एकूण 33 पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ 8 पदे भरलेली आहेत, तर 25 पदे रिक्त आहेत. याचा अर्थ, जवळपास 75 टक्के पदे रिक्त असतानाही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये वर्ल्ड डान्स डे, योग दिन, हर घर तिरंगा अभियान, विविध लोककला महोत्सव, कार्यशाळा, ऑक्टेव्ह, खजुराहो फेस्टिव्हल आणि ऑरेंज सिटी क्राफ्ट मेला यांसारख्या राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. या केंद्राकडे हवाई तिकिट खर्चाचा तपशील उपलब्ध नाही. तसेच, बाहेरील संस्थांना अनुदान दिले जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे आणि कार्यक्रम खर्चाचे सविस्तर विवरण (ब्रेकअप) अस्पष्ट असल्याचे कळवले आहे. यामुळे केंद्राच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या कमी कर्मचाऱ्यांवर शेकडो कार्यक्रम कसे चालतात, कोट्यवधी रुपये खर्च करूनही रिक्त पदे का भरली जात नाहीत आणि व्यवस्थापनाचा भार नेमका कोण उचलतो, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
Source link
सांस्कृतिक केंद्रात 107 ते 132 कार्यक्रम; 75% पदे रिक्त:3 वर्षांत 30 कोटी खर्च, तरी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नाही