Headlines

सालियन खटल्याची ‘दिशा’आता सीबीआयच्या हातात:दिशा सालियन मृत्युप्रकरणी सीबीआय तपासाचे हायकोर्टाचे आदेश




दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला सहा वर्षानंतर बुधवारी (२ सप्टेंबर) अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून तत्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले असून संपूर्ण तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) अंतर्गत करण्याचे स्पष्ट केले आहे. या खटल्यात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, त्याविषयी न्यायालयाने कोणतेही निर्देश दिले नाही. गेल्या सहा वर्षांपासून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात केवळ सीआरपीसी कलम १७४ अंतर्गत अपघाती मृत्यूची (एडीआर) मर्यादित चौकशी केली होती, यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दिशा १२ व्या मजल्यावरून पडूनही घटनास्थळी रक्ताचा थेंबही कसा नाही. मालवणी पोलिस ठाण्याने ९ तासानंतर पंचनामा का केला, असे ताशेरे मारत न्यायालयाने फॉरेन्सिक अहवालातील विसंगती आणि लॅपटॉप-मोबाईल आठ दिवस उशिरा जप्त करणे यासारख्या पोलिसांच्या १० गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. पुराव्यांशिवाय कोणालाही थेट आरोपी मानले जाऊ नये, असे निर्देश देत मालवणी पोलिस ठाण्याला सर्व कागदपत्रे व पुरावे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. या आदेशानंतर “आता आम्हाला १०० टक्के न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया दिशाच्या वडिलांनी दिली. आदित्य ठाकरे आणि उद्धवसेनेची कोंडी होणार दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय उद्धवसेना, आदित्य ठाकरेंची कोंडी करणारा आहे. आता सीबीआय नव्याने एफआयआर नोंदवून संबंधितांचे जबाब नोंदवणार असल्याने विरोधकांच्या हाती धारदार अस्त्र मिळाले आहे. महायुती या न्यायालयीन आदेशाचा पुरेपूर राजकीय वापर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धवसेनेला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची शक्यता आहे. ६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सर्व बाजूंनी सखोल चौकशीचा मार्ग मोकळा सीबीआयकडे तपास सोपवण्याने आदित्य ठाकरेंची चौकशी होईल का असे विचारले जात आहे. त्यावर एक नक्की आहे की, आता सीबीआय संपूर्ण प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करेल. सहा वर्षांनंतर होणाऱ्या तपासात पुरावे मिळणे नक्कीच आव्हानात्मक आहे. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणात काही ठोस तथ्यांच्या आधारावर हे आदेश दिले असतील, तर सीबीआय त्या तथ्यांचा तपास करू शकते. तपासाचे आदेश म्हणजे थेट आरोपपत्र दाखल करणे नव्हे. म्हणून कुणाला किती धोका निर्माण झाला किंवा कायदेशीर अडचण वाढली आहे, यावर थेट निष्कर्ष काढता येणार नाही. घटनाक्रम ८-९ जून २०२० : मालाड प.च्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून दिशाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद. १४ जून २० : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू. १७ जून २०२० : रोहन रायकडून दिशाचा लॅपटॉप, मोबइल जप्त. ऑगस्ट २०२० : मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले. मार्च २०२५ : सतीश सालियन यांची सीबीआय चौकशीची मागणी. ३ ऑगस्ट २०२६ : पोलिसांवर हायकोर्टाचे ताशेरे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *