Headlines

सिया गोयलच्या कुटुंबीयांची लोणावळा पोलिसांकडून कसून चौकशी:केतन अग्रवाल हत्याकांडात आई, वडील-भाऊ पोलिस ठाण्यात हजर




पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ला हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान झाला आहे. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल, आई पूजा गोयल आणि वडील प्रवीण गोयल यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार हे तिघेही लोणावळा पोलिस ठाण्यात हजर झाले असून, पोलिसांकडून त्यांची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी, शुक्रवारी (26 जून) पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल 10 तास प्रदीर्घ चौकशी केली होती. सकाळी पोलिस ठाण्यात हजर झालेल्या साहिलला रात्री उशिरा घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी साहिलकडे आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यातील संबंधांबाबत विचारपूस केली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, साहिलने पोलिसांसमोर दावा केला आहे की, सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते याबद्दल त्यांच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना नव्हती. तसेच जर तिने या लग्नाला विरोध दर्शवला असता, तर कुटुंबाने जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले नसते. मात्र, मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी यापूर्वीच सियाच्या कुटुंबावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण कटामध्ये सियाच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही हात असू शकतो, असा आरोप त्यांनी केल्यामुळे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. शनिवारी साहिलसह तिची आई पूजा गोयल आणि वडील प्रवीण गोयल पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर, पोलिस त्यांचे सविस्तर जबाब नोंदवून घेत आहेत. हत्येपूर्वीच्या काही दिवसांत त्यांच्या घरात काय घडामोडी घडल्या आणि त्यांना या गुन्ह्याबाबत किंवा सियाच्या संबंधांबाबत काही पूर्वकल्पना होती का, यावर पोलिस लक्ष केंद्रित करत आहेत. 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळल्याने त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा फोटो काढताना पाय घसरून झालेला अपघात असल्याचा बनाव सिया गोयल हिने केला होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तांत्रिक तपासात, मोबाईल कॉल्स, चॅट्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धक्कादायक वास्तव समोर आले. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी पूर्वनियोजित कट रचून केतनला गडावरून दरीत ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या हे दोन्ही मुख्य आरोपी पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *