Headlines

सीईओ सत्यम गांधींकडून दर्यापूरमधील विकासकामांची तपासणी:आरोग्य, घरकुल, नरेगा, स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी




जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय आणि विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्याची सुरुवात येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीने झाली. परिसरातील अस्वच्छता पाहून सीईओ गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील भेटीदरम्यान अशी परिस्थिती दिसू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांना दिले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यात आली. संभाव्य मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णांसाठी उपलब्ध बेडशीट, उशा आणि ब्लँकेटची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या स्वच्छतेबाबत समाधानकारक व्यवस्था राखण्यास सांगितले. नवीन साहित्य विहित प्रक्रियेनुसार खरेदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ऑपरेशन थिएटर, प्रसाधनगृहे आणि इतर आरोग्य सुविधांची पाहणी करून तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दर्यापूरच्या पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा-१ आणि टप्पा-२ मधील घरकुले पूर्ण करणे, एफटीओ (Fund Transfer Order) एका आठवड्यात पूर्ण करणे आणि लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना, घरकुलांचे मस्टर त्वरित काढणे, सर्व पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करणे, आधार सीडिंगसाठी विशेष शिबिरे घेऊन पंधरा दिवसांत काम पूर्ण करणे आणि कोणतीही बिले प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश दिले. लेखा विभागाच्या आढाव्यात पंचायत, बांधकाम, शिक्षण आणि इतर सर्व विभागांनी प्रलंबित लेखा आक्षेप विहित मुदतीत काढावेत, असे आदेश देण्यात आले. कृषी विभागास विशेष घटक योजनेतील सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यास सांगण्यात आले. बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी अभिषेक कसोदे यांच्यासह पंचायत समिती दर्यापूरमधील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *