Headlines

विधान परिषद मतदान; 637 मतदार बजावणार हक्क:औरंगाबाद-जालना मतदारसंघात 13 केंद्रांवर तीन उमेदवार रिंगणात




आज (१८ जून) रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेचे मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत दोन जिल्ह्यांतील १३ मतदान केंद्रांवर एकूण ६३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दुपारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात हे साहित्य संबंधित तालुक्यांमध्ये रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ९ क्षेत्रीय अधिकारी, १७ मतदान पथके (४ राखीव) आणि एकूण ८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नि:पक्ष मतदानासाठी २६ सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. एकूण ६३७ मतदारांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३९९ तर जालना जिल्ह्यात २३८ मतदारांचा समावेश आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचा केवळ एकच गुन्हा दाखल झाल्याचे गौडा यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात जमा केले जाईल. याच ठिकाणी सोमवार, २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि उपजिल्हाधिकारी सविता चौधर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *