![]()
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पद्मश्री लिला पूनावाला यांनी संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. पारंपारिक शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडून या क्षेत्रात लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हा स्थापना दिन सोहळा पार पडला. यावेळी लिला पूनावाला फाऊंडेशनच्या संस्थापक आणि सीओईपीच्या माजी विद्यार्थिनी पद्मश्री लिला पूनावाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू सुनील भिरूड, कुलसचिव प्रा. डॉ. दयाराम सोनवणे आणि नियामक मंडळाचे राज्यपाल नियुक्त सदस्य भरत गीते उपस्थित होते. लिला पूनावाला म्हणाल्या की, प्राध्यापकांना केवळ तासिका घेण्यात अडकवून न ठेवता, त्यांना संशोधनासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. चिखली येथे उभारण्यात आलेले संशोधन आणि विकास केंद्र हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विषयांसोबत नैतिक मूल्यांचे धडे देणेही गरजेचे आहे, तसेच त्यांची ‘पॅकेज’ मनोभूमिका बदलण्याची गरज आहे. त्यांनी पुढे सांगितले की, उद्याचे सजग आणि जबाबदार नागरिक तसेच अभियंते घडवण्यासाठी शाळा पातळीवर, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि उत्सुकता अधिक आढळते; त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उद्याचे संशोधक बनू शकतात. त्यांच्या फाऊंडेशनतर्फे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते आणि त्यातील अनेक जणी अभियंता बनून भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत, याचा त्यांना आनंद आहे. यावेळी बोलताना नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी सांगितले की, भारत सेवा क्षेत्राच्या अर्थकारणाकडून निर्मिती क्षेत्राकडे वाटचाल करत आहे. अभियंते हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांनी अधिकाधिक संशोधन आणि त्याच्या स्वामित्व हक्कांवर भर दिला पाहिजे. सीओईपीच्या प्रगतीमध्ये उद्योग क्षेत्रासह माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी नमूद केले. नियामक मंडळाचे राज्यपाल नियुक्त सदस्य भरत गीते यांनी सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कामाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, देशात आणि परदेशातही प्रशासनापासून मोठ्या औद्योगिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सीओईपीचे विद्यार्थी कार्यरत आहेत. १७२ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली सीओईपी ही केवळ अभियंतेच नव्हे, तर नेतृत्व घडवणारी संस्था आहे.
Source link
सीओईपी स्थापना दिनी लिला पूनावाला::संशोधन-विकासावर भर द्या, प्राध्यापकांना पुरेसा वेळ द्या