![]()
पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी 5 हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील 19 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठवून या राख्या स्वीकारण्याची विनंती केली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे शहरासाठी आध्यात्मिक अभिमानाचे प्रतीक आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त सीमेवर कार्यरत जवानांना ट्रस्टच्या माध्यमातून 5 हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या राख्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेत तयार करण्यात आल्या आहेत. जवानांच्या मनगटावर पुण्यातून पाठवलेली राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या उपक्रमामागे आहे. बालन यांनी पत्रात जवानांना या राख्या स्वीकारून रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणेकरांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती केली आहे. या उपक्रमासाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे यांचे सहकार्य लाभले आहे. पुनीत बालन म्हणाले की, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून माझी निवड होणे हे मी माझे भाग्य समजतो. या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांपासून दूर देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवान बांधवांसाठी पाच हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत. या राख्या बौद्धिक अपंगांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेतून तयार झाल्या आहेत.
Source link
सीमेवरील जवानांसाठी पुण्यातील दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 5 हजार राख्या पाठवणार:पुनीत बालन यांची मेजर जनरल जोशी यांना स्वीकारण्याची विनंती