Headlines

सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट:सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये चर्चा; तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो- तटकरे




राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याचे सांगितले जात असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तटकरे यांचे नाव नसल्याच्या चर्चा आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाला सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांचा विरोध असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नुकत्याच घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो – सुनील तटकरे या भेटीसंदर्भात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार साहेबांची तब्येत गेली काही दिवस ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. आज साहेबांना वेळ होती, त्यामुळे मी त्यांना आज भेटायला आलो असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही, कोणतेही राजकारण नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सुनील तटकरे-शरद पवारांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुनील तटकरे यांनी ही भेट शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचा दावा केला असला, तरी या भेटीच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव पद आणि प्रफुल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या नावाचा तसा उल्लेख नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे दोन्ही बडे नेते तांत्रिकदृष्ट्या अद्याप या पदांवर कायम आहेत की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण असून या भेटीमुळे त्या चर्चेला अधिक धार आली आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आसामचा एकत्रित दौरा केला होता, ज्यातून पक्षात सर्व काही अलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात होते. या दौऱ्यानंतर लगेचच तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट आहे की राष्ट्रवादीतील आगामी मोठ्या बदलांचे संकेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *