![]()
बीड येथील एका व्यक्तीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचा दावा केला आहे. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवार सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. राजकारणात असा धोका असतो. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी सावध राहिले पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांवरही निशाणा साधला. मंत्री संजय शिरसाट यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यात त्यांनी सुनेत्रा पवारांविषयी उपरोक्त विधान केले. बीड येथील एका व्यक्तीने भोंदू अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडे सुनेत्रा पवार यांना रुपाली चाकणकरांपासून धोका असल्याचा दावा केला आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका आहे की नाही हे माहिती नाही. पण त्यांनी सावध राहिले पाहिजे. राजकारणात असा धोका असतो. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. रुपाली चाकणकर आहे की इतर कुणी हे तपासात समोर येईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचे विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय शिरसाट याविषयी बोलताना म्हणाले, वारकरी संप्रदायात अनेक जातींचे लोक असतात. त्यात कुणीही एका जातीचा नसतो. त्यामुळे त्याला जातीय बळ देणे हा प्रचार आहे. हिंदू समाजाल डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवारांनी हिंदू समाजाची ताकद विभागण्याचा प्रयत्न करू नये. त्यात घुसखोरी होईल असे म्हणू नये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भोंदू अशोक खरातच्या जागी एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर सर्व मुस्लिमांची वरात काढण्यात आली असती असा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी त्यांच्या या दाव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, विजय वडेट्टीवारांचे विधान करणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. अनेक मुस्लिम बाबा तुरुंगात आहेत. 2012-13 पासून अनेकजण तुरुंगात आहेत. राम रहीम जेलमध्ये आहे. कोणताही बाबा असो, त्याच्या जातीवर जाऊ नये. हिंदू-मुस्लिम करण्यापेक्षा बलात्कारी अशी भूमिका पाहिजे. अशोक खरात प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नाही. त्यात जमीन घोटाळ्यासह अनेक प्रकरणांची गुंतागुंत आहे. त्यात चौकशीची कसोटी लागणार आहे. त्याच्या सहकाऱ्यांची नावे लवकरच समोर येतील आणि ते तुरुंगात जातील, असे संजय शिरसाट म्हणाले.
Source link
सुनेत्रा पवारांनी सावध रहावे, स्वतःची काळजी घ्यावी:सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा सल्ला; शरद पवारांवरही साधला निशाणा