![]()
सेनगाव ते रिसोड मार्गावर वाढोणा शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांच्या मृतदेहावर रविवारी ता. 2 सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील सुमारे 200 पेक्षा अधिक कामगार कामाच्या निमित्ताने विदर्भातील रिसोड येथे ये जा करतात. पानकनेरगाव येथील सुजीत बांगर (26) व निलेश बांगर (25) चुलत भाऊन देखील दररोज रिसोड येथे जातात. नेहमी प्रमाणे शनिवारी ते त्यांच्या दुचाकी वाहनावर रिसोड येथे गेले होते. त्या ठिकाणी काम आटोपून रात्रीच्या सुमारास गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, सेनगाव ते रिसोड मार्गावर वाढोणा शिवारात हळदीची वाहतूक करणारा ट्रक नादुरुस्त झाला होता. त्यामुळे चालकाने ट्रक रस्त्यावर उभा केला होता. रात्रीसुमारे नऊ वाजता त्यांचे दुचाकी वाहन वाढोणा शिवारात आले असतांना समोर उभा ट्रक दिसलच नाही. त्यामुळे दुचाकी वाहन ट्रकवर आदळले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती रिसोडकडून हिंगोलीकडे येणारे प्रवासी पवन उपाध्याय यांनी तातडीने सेनगाव पोलिसांना देऊन रुग्णवाहिका बोलावली. या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजूदास जाधव, परशुराम नागरे, तुकाराम मारकडे, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुजीत व निलेश यांना सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. त्यानंतर रविवारी ता. 2 सकाळी दोघांच्याही मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. या घटनेमुळे पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे.
Source link
सेनगाव-रिसोड मार्गावर उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून अपघात:पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू