![]()
‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, खरातने आर्थिक संकट दूर होऊन व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती प्राप्त होईल, असे खोटे आमिष दाखवून अवघी एक हजार रुपये मूळ किंमत असलेली पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल 2.62 लाख रुपयांना विकली होती. याशिवाय, अलौकिक शक्ती आणि चमत्कारिक लाभांचे खोटे आश्वासन देऊन त्याने इतरही अनेक वस्तू भक्तांना अशाच प्रकारे अव्वाच्या सव्वा किमतीला विकल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. ईडीच्या तपासात उघड झाले आहे की, भोंदूबाबाने अवघ्या 100 रुपये किलो दराने मिळणाऱ्या चिंचेच्या बिया भक्तांना 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकल्या, तर 300 ते 500 रुपये प्रति लिटर दराने मिळणारा साधा मध ‘दैवी मध’ असल्याचे भासवून तब्बल 7 लाख रुपये प्रति लिटर दराने विकला. यासोबतच, ग्रहदोष दूर करून यश मिळवून देणारी ‘ऊर्जित’ रत्ने असल्याचे सांगून त्याने सामान्य रत्नेही लाखो रुपयांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भक्तांच्या या फसवणुकीतून जमा झालेला प्रचंड पैसा विविध बँक खात्यांमधून फिरवून त्याचा मूळ स्रोत लपवण्याचा म्हणजेच मनी लाँड्रिंगचा प्रयत्न झाल्याचा संशयही ईडीने व्यक्त केला आहे. महागड्या अंगठ्या निघाल्या खोटे दागिने जप्त केलेल्या अंगठ्यांचे मूल्यांकन केले असता त्या केवळ साधे आणि नकली दागिने असल्याचे निष्पन्न झाले असून, हा सर्व प्रकार एका संघटित आर्थिक फसवणुकीचाच भाग असल्याचा दावा ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये केला आहे. दरम्यान, समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता येथील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी आणि भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणीसाठी कोठडीची मागणी अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासोबतच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि ज्याच्यावर महिला अत्याचाराचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत, अशा भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा आता सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष पथकाने घेतला आहे. या कारवाईनंतर, आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी ईडीने त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले असून पुढील तपासासाठी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.
Source link
100 रुपयांचे चिंचोके लाखाला तर मध 7 लाख रुपये लिटर!:भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुकीचे ED कडून धक्कादायक खुलासे