![]()
सोलापूर शहरातील कस्तुरबा नगर (नई जिंदगी भाग) येथे असलेल्या श्री श्री सद्गुरू बसवारुढ महास्वामींच्या मठाला उडवून देण्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरू म्हणून ख्याती असलेल्या या 52 वर्षे जुन्या मठात, एका महिलेने ही धमकीची चिठ्ठी टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेहरुनिस्सा लाडलेसाब शेख नामक संशयित महिलेला अटक केली असून, तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? मठातील शिवपुत्र स्वामीजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी एक अज्ञात महिला मठात आली आणि तिने पुजाऱ्याला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. पुजाऱ्याने ती घेण्यास नकार दिल्यावर, तिने आत असलेल्या महाराजांना ही चिठ्ठी देण्यास सांगितले. मात्र, कोणीही चिठ्ठी न घेतल्याने ती महिला चिठ्ठी मठात फेकून निघून गेली. हा सर्व प्रकार मठातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या चिठ्ठीमध्ये राजकीय पुढारी आणि मुस्लिम समाजातील काही लोकांवर गंभीर आरोप करण्यासोबतच, “मंदिर हम उडा देंगे” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मठात आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक या घटनेनंतर सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर भैरवाडे म्हणाले, “हा मठ मुस्लिमबहुल भागात असून गेल्या 55 वर्षांपासून येथे शांततेत कार्य सुरू आहे. या मठाचा किंवा येथील साधकांचा कोणाशीही वाद नाही. तरीही अशी धमकी येणे गंभीर आहे. चिठ्ठी लिहिणाऱ्या महिलेच्या मागे कोणते षड्यंत्र आहे, हे पोलिसांनी शोधून काढावे. एटीएस (ATS) मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मठाला व महाराजांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे.” हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा इशारा “सध्या राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, त्यामुळे आम्हाला संरक्षणासाठी रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे. पोलिसांनी मठाला संरक्षण न दिल्यास, आम्ही स्वतः तिथे बंदोबस्त देऊ,” असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. पोलीस तपास सुरू मठातील लोकांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिला मेहरुनिस्सा लाडलेसाब शेख हिला अटक केली. प्राथमिक अंदाजानुसार, तिने हे कृत्य मानसिक विकृतीतून केले असावे असा संशय आहे. मात्र, चिठ्ठीतील विसंगत मजकूर आणि “मंदिर उडवून देऊ” या थेट धमकीमुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.
Source link
सोलापूर हादरले:मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गुरूंचा मठ उडवून देण्याची धमकी, संशयित महिलेला पोलीस कोठडी