Headlines

‘सौर चरख्यावर निर्मित शाल’ची राष्ट्रीयस्तरावर दखल:मेळघाटातील महिलांच्या कलाकुसरीची विशेष शाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द




जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल मेळघाट क्षेत्रातील महिला कारागिरांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याच्या साहाय्याने पारंपरिक, आधुनिक व पर्यावरणपूरक कौशल्याचा साज चढवून तयार केलेली एक विशेष शाल सोमवार, २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका गौरवपूर्ण समारंभात स्वागतस्वरूपात प्रदान करण्यात आली. हा प्रसंग मेळघाटातील आदिवासी महिलांचे कौशल्य व आत्मनिर्भरता अधोरेखित करणारा थेट राष्ट्रस्तरावरील बहुमान ठरला आहे. दुर्गम व आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती असूनही मेळघाटच्या महिलांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या हस्तकलेने देशाच्या पटलावर अमरावती जिल्ह्याचे व संपूर्ण महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे २ नोव्हेंबर रोजी ‘भारत रिन्युअल एनर्जी समिट २०२६’ या गौरवपूर्ण आयोजनाच्या उद्घाटन सोहळ्यात स्वागतस्वरूपात मेळघाटातील खादी ग्रामोद्योगाच्या ”कुटीर” ब्रँडतर्फे तयार करण्यात आलेली आकर्षक, नैसर्गिक पानांच्या ठश्यांची सौर-चरखा शाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आली. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत १३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ४० हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक व ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला अमरावती विकेंद्रित सौर-चरखा क्लस्टर हा ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सौर चरख्यापासून निर्मित शाल कारागिरांच्या आत्मनिर्भरतेचा संगम मेळघाटातील महिलांनी विशेष कलाकुसरीतून साकारलेली ही विशेष शाल पारंपरिक हस्तकला, आधुनिक नवोपक्रम, पर्यावरण संरक्षण व स्थानिक कारागिरांच्या आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम आहे. दुर्गम भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक व हरित ऊर्जेचा वापर करून महिलांनी सूत कताईचे काम केले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे केवळ कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत झाली नाही. खादी व हस्तकलेला आधुनिक, डिजिटल व शाश्वत स्वरूपही मिळाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *