![]()
राज्य शासनाने वीज ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात पंढरपूर शहरात बुधवारी अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंदील हाती घेऊन आणि अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत महावितरण प्रशासनाचा निषेध केला. पंढरपूर शहरात महावितरण कडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, या मीटर मुळे अवाजवी वीज बिल येत आहे, त्यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. या विरोधात शिवक्रांती युवा संघटनेने मागील चार महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. तरीही वीज मीटर बसवणे सुरू असल्याने बुधवारी अर्धनग्न आंदोलन छेडण्यात आले. हे आंदोलन शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर चौकातील महावितरण कार्यालयादरम्यान करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत “स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन” असा मोठा फलक (बॅनर) हाती धरला होता. यावेळी आंदोलकांनी महावितरण आणि सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते सावरकर चौकातील महावितरण कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्ते भररस्त्यात जमिनीवर ठाण मांडून बसले होते. यावेळी त्यांनी आपल्यासोबत एक पारंपारिक कंदीलआणला होता. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होणार असून, पुन्हा एकदा कंदिलाच्या युगात जगण्याची वेळ गरिबांवर येईल,” असा गर्भित इशारा या कंदिलाच्या माध्यमातून आंदोलकांनी प्रशासनाला दिला. . सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर लादली जाणारी स्मार्ट मीटर योजना त्वरित रद्द करण्यात यावी. . वीज बिलांच्या नावाखाली होणारी ग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी. . जर प्रशासनाने हे सक्तीचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर भविष्यात याहूनही तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलकांच्या मागण्या .
Source link
स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर मोर्चा