![]()
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीला अभिवादन करण्यासाठी क्रांतिदिनानिमित्त पुण्यात प्रथमच अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलन आयोजित करण्यात आले आहे. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता हे संचलन शहराच्या मध्यभागी होणार असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला विनायक हळबे, नरेंद्र पाटील, जनक टेकाळे आणि समीर धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. गुणेश पुरंदरे यांनी सांगितले की, या यात्रेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून प्रारंभ होईल. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे ही यात्रा टिळक चौक, लकडी पूल आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे समाप्त होईल. या संचलनामध्ये १५ प्रशिक्षित घोडेस्वार सहभागी होणार असून, यात आठ वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी असतील. अश्वावर स्वार होऊन हातात तिरंगा ध्वज घेत क्रांतिकारकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. या अश्व संचलनात अश्वारोहण खेळामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम केलेले खेळाडूही सहभागी होतील. छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथे राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप होईल. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, विविध गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी मागील पंचवीस वर्षांपासून अश्वारोहण प्रशिक्षण, अश्वारोहण मोहिमा आणि अश्वारोहण स्पर्धांच्या माध्यमातून हा पारंपरिक व आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा प्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. नुकतीच मे महिन्यात २५ किल्ल्यांवरून ‘शिवचरित्र प्रसार’ ही अश्व मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती, ज्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
Source link
हातात तिरंगा, अश्वावर स्वार!:पुण्यात पहिल्यांदाच 'अश्वारूढ तिरंगा यात्रे'तून क्रांतिकारकांना मानवंदना