![]()
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली भागात मध्यरात्रीच्या सुमारास टिप्पर मधून वाळूतस्करीचा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी पर्दाफाश केला असून टिप्पर पकडल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या विदर्भातील एकास गोरेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी दोघांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात वाळू वाहतूकीला लगाम बसल्यानंतर आता वाळूतस्कर बाहेर जिल्हयातून वाहनांद्वारे वाळून आणून हिंगोली जिल्हयात पुरवठा करीत आहेत. नांदेड व विदर्भातील वाशीम जिल्हयातून वाळू हिंगोली जिल्हयात आणली जात असून या संदर्भात काही तक्रारीही महसूल व पोलिस विभागाकडे केल्या जात आहेत. विशेष म्हणजे वाळूतस्कर मध्यरात्रीच्या सुमारास वाळू वाहतूक करीत असल्याचे चित्र होते. दरम्यान, विदर्भातील वाशीम भागातून एका टिप्परमधून गुरुवारी ता. 14 मध्यरात्री वाळू आणण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांना मिळाली होती. या माहितीवरून घुटुकडे यांनी तलाठी यांना सोबत घेऊन थेट गोरेगाव चौफुली गाठली. गोरेगाव ते सेनगाव रोडवरील गोरेगाव चौफुलीवर त्यांनी एक टिप्पर थांबवून चालक समाधान राऊत (रा. तोंडगाव, जि. वाशीम) याची चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे सदर वाळू अवैध असल्याने उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी टिप्पर गोरेगाव पोलिस ठाण्यात आणण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एका बोलोरो जीपमधून आलेल्या संजय गोरे (रा. तोंडगाव, जि. वाशीम) याने त्या ठिकाणी येऊन टिप्पर समोरच जीप उभी केली अन टिप्पर नेण्यास मज्जाव केला तसेच चालक राऊत यास पळवून लावले. यावेळी त्याने गोंधळ घालून उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र त्याच्या धमकीला भिक न घालता घुटुकडे यांनी तातडीने गोरेगाव पोलिसांना पाचारण केले. गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार इम्राण पठाण, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन संजय गोरे यास ताब्यात घेतले. त्यांनतर टिप्पर व वाळू असा 15.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांच्या तक्रारीवरून समाधान राऊत, संजय गोरे यांच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोली वाळू माफियांना दणका!:विदर्भातील वाळू तस्करीचे रॅकेट उघड, टिप्पर रोखणाऱ्या गुंडाला बेड्या, गोरेगाव चौफुलीवर कारवाई