![]()
हिंजवडी परिसरातील प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी करून अवघ्या काही तासांत अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश महादेव झांबरे (वय 23, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; सध्या भुमकर चौक, हिंजवडी) याचे एका तरुणीसोबत पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध निर्माण झाल्याचा राग आरोपीच्या मनात होता. या कारणावरून गुरुवारी (6 ऑगस्ट) आरोपीने संबंधित तरुण व तरुणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी त्याच्या अर्टिगा कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पसार होत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी उरुळीकांचन पोलिसांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहन आढळताच पोलिसांनी त्याला थांबवून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पण सखोल चौकशीत त्याने हिंजवडीतील हत्या व हल्ल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईत उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने सापळा रचत आरोपीला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत.
Source link
हिंजवडीत प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर:पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत आरोपी जेरबंद