Headlines

हेल्मेट न घातल्यास एक हजारांचा दंड, शनिवारपासून अंमलबजावणी:शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईनंतर सर्वसामान्यांवर नजर‎




संपूर्ण जिल्ह्यात १ ऑगस्टपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती अत्यंत कडकपणे लागू केली जाणार आहे. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी (झिरो फॅटिलिटी) पोलिस प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून कोणतीही पूर्व-जनजागृती न करता थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर बसल्याबरोबर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून नियम मोडणाऱ्यांवर कलम १२९ नुसार एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सांगितले. दरम्यान, हेल्मेट सक्तीची ही मोहीम केवळ शहरापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागात राबवली जाणार आहे. सर्व चौकांमध्ये व महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिस तैनात केले जाणार आहेत. यावेळी हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेटसक्ती करण्याअगोदर मागील १० दिवसांपासून पोलिस आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर हेल्मेटसक्तीचे फलक लावण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, मोटार वाहन कायद्यानुसार चालक आणि मागे बसणारा प्रवासी (पिलियन रायडर) या दोघांनाही हेल्मेट सक्तीचे आहे. मात्र, सुरुवातीला किमान चालकाने हेल्मेट घातलेले असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. ही मोहीम केवळ शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार आहे. सर्व पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चौका-चौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर थांबून पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यापेक्षा आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Q : हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कशी असणार? A : चौकाचौकात वाहतूक पोलिस तैनात राहणार असून हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. Q : सुरुवातीला जनजागृती करणार की थेट दंड आकारणार? A : मोटार वाहन कायद्यात दुचाकीवर बसल्याबरोबर हेल्मेट घालणे बंधनकारक आहे, त्यामुळे आता जनजागृती न करता थेट अंमलबजावणी सुरू होणार आहे. Q : या मोहिमेची सुरूवात शासकीय कर्मचाऱ्यांपासून का केली? A : नागरिकांसमोर उदाहरण घालण्यासाठी गत १० दिवसांपासून पोलिस व शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. Q : हेल्मेट केवळ चालकाला की मागे बसणाऱ्यालाही आवश्यक? A : मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालवणारा चालक व मागे बसणारा या दोघांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, किमान चालकाने तरी हेल्मेट घालायलाच हवे. नुकतेच खदान पोलिस ठाणे हद्दीत आणि खडकी रोडवर दोन दुर्दैवी अपघात झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांनी जर हेल्मेट घातले असते, तर त्यांचे प्राण नक्कीच वाचले असते. गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता अपघातातील मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे थांबवणे म्हणजेच ‘झिरो फॅटलिटी’ हे पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट आहे. मनोज बहुरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा. आता थेट अंमलबजावणी स्वरक्षणासाठी हेल्मेटचा वापर करण्यात यावा ^गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी झाले आहे. नुकत्याच झालेल्या अपघातांत हेल्मेट असते तर प्राण वाचले असते. ही कारवाई दंड वसूल करण्यासाठी नसून जीव वाचवण्यासाठी आहे. – अर्चित चांडक, पोलिस अधीक्षक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *