Headlines

12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद:पायधुनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ट्रॉम्बेतून केली अटक




घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर अटक केली. ख्वाजा सलीम शेख (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ट्रॉम्बे येथील पायलीपाडा परिसरातून ताब्यात घेतले. पायधुनी पोलीस ठाण्यात 2014 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 200/2014 नुसार भारतीय दंड विधानातील कलम 454, 380, 342, 411 आणि 34 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा कोर्ट केस क्रमांक 686/PW/2014 असा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ख्वाजा सलीम शेख हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या 12 वर्षांपासून तो फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाट झोपडपट्टी परिसरात राहत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. त्याच्याबाबत पोलिसांकडे त्याच्या नावाव्यतिरिक्त फारशी माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक वर्षे शोध घेऊनही त्याचा ठोस ठावठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, पायधुनी पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पुन्हा तपास सुरू केला. पोलिसांनी विविध ठिकाणी माहिती घेत असताना गोपनीय सूत्रांकडून ख्वाजा सलीम शेख याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी ट्रॉम्बे परिसरातील पायलीपाडा येथे राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. या कारवाईमुळे 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. पायधुनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तपासामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार इक्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राणे आणि पोलीस हवालदार कानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *