![]()
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-नरसी महामार्गालगत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या सुमारास देगाव शिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि दुकानातील खाद्यपदार्थ लंपास केल्याचे समोर आले आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे कुंटूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देगाव शिवारातील माणिकप्रभू पेट्रोल पंपासमोर परराज्यातील वाहन उभे असताना चालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येते. ही घटना पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. यानंतर चोरट्यांनी द गार्डन गॅलरी नर्सरी येथे मजुरी करणाऱ्या रामचंद्र गणेश चनेबोईनवाड यांच्या घराला लक्ष्य केले. कुटुंबीय झोपेत असताना घरातील लोखंडी पत्र्याची पेटी चोरून नेण्यात आली. काही अंतरावर पेटी फोडून त्यातील सुमारे २० हजार रुपये रोख, १२ ग्रॅम सोन्याचा नेकलेस आणि लहान मुलाच्या गळ्यातील ओमचे पान असा ऐवज चोरून नेल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर चोरट्यांनी साई पेट्रोल पंपासमोरील चिंचवड यांच्या दुकानाचे पत्रे काढून आत प्रवेश केला. दुकानातील रोख रकमेसह खाण्यापिण्याच्या वस्तूंवरही चोरट्यांनी हात साफ केला. एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे चित्र आहे. पहाटे तीन ते पाचदरम्यान चोरी; गस्त नेमकी कुठे? महामार्गालगतची ही ठिकाणे संवेदनशील असतानाही पहाटेच्या वेळेत पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. महामार्गावर परराज्यातील वाहने थांबत असतात. अशा वेळी संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, वाहनांची तपासणी करणे आणि नियमित गस्त घालणे अपेक्षित असताना एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने गस्तीच्या प्रभावीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘गस्त होते की केवळ कागदावर?’ कुंटूर फाटा आणि महामार्ग परिसरात रात्री नियमित गस्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, पहाटेच्या अंधारात चोरटे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन चोरी करीत असतील, तर गस्तीचा नेमका परिणाम काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. पोलिसांनी या घटनांचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे, चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करावा आणि महामार्ग परिसरातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी, अशी मागणी होत आहे.
Source link
नांदेड-नरसी महामार्ग चोरट्यांच्या निशाण्यावर:पहाटेच्या अंधारात रोख रक्कम, सोने, मोबाईलसह खाद्यपदार्थ लंपास, एकाच रात्री तीन चोऱ्या; कुंटूर पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह