“मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार आणि सर्वसामान्य जनतेचा कौल पूर्णपणे महायुतीच्याच बाजूने आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे प्रश्न सातत्याने लावून धरले असून, यंदाच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रात एक
.
छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषद मराठवाडा पदवीधर निवडणुकीनिमित्त महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मंत्री संजय शिरसाट माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघातील महायुतीची रणनीती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पुण्यातील बंडखोरी आणि ठाकरे बंधूंच्या मोर्चात आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीवर भाष्य केले.
मंत्र्यांच्या उपस्थितीत सतीश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवत सतीश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिरसाट म्हणाले, “महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे सहकारी मित्र सतीश चव्हाण यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. आज कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्यानंतर कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मराठवाड्यातील पदवीधरांचा महायुतीवर आणि सतीश चव्हाणांवर गाढ विश्वास आहे. पदवीधरांच्या पाठिंब्याच्या जोरावर ही निवडणूक आम्ही ऐतिहासिक मताधिक्याने जिंकू,” असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.
एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही
जिल्ह्यातील 25 टक्के शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नसल्याच्या आणि केवायसीच्या (KYC) अडचणींबाबत विचारले असता मंत्री शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. “काही तांत्रिक कारणांमुळे किंवा केवायसी प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांची नावे यादीत राहिली असतील, तरी शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. सर्व नावांची पडताळणी पूर्ण करून ती तत्काळ निश्चित केली जातील. राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील एकाही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची संपूर्ण खबरदारी शासन घेत आहे.”
पुण्यात मंगेश चिवटेंच्या बंडखोरीवर चर्चा सुरू
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) नेते मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर शिरसाट म्हणाले, “मोठ्या निवडणुकीत एखाद्या जागेवर अशी स्थानिक परिस्थिती किंवा नाराजी निर्माण होणे ही काही विशेष बाब नाही. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मित्रपक्षांमध्ये समन्वय साधून लवकरच यावर योग्य आणि समाधानकारक तोडगा काढला जाईल.”
आदित्य ठाकरेंना टोला- मुंबईत ऊन असल्याने ते लंडनला गेले असतील!
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंनी काढलेल्या मुंबईतील मोर्चाच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे गैरहजर राहिल्याबाबत विचारले असता संजय शिरसाट यांनी खोचक टोला लगावला. “आदित्य ठाकरे कदाचित लंडनच्या दौऱ्यावर गेले असतील. सध्या तिकडचे वातावरण छान आणि आल्हाददायक आहे. मुंबईत सध्या कडक ऊन पडल्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास होत असेल, म्हणून ते मोकळी हवा खायला लंडनला गेले असावेत,” अशी मिश्कील आणि उपरोधिक टिप्पणी करत शिरसाट यांनी विरोधकांच्या मोर्चातील विसंगतीवर निशाणा साधला.
——————————————————-
हेही वाचा…
महायुतीच्या ‘ट्रिपल इंजिन गँग’मध्ये टोळीयुद्ध सुरू: टिळक भवनात पोलिसांचा धुडगूस म्हणजे फडणवीसांचे ‘घाशीराम कोतवाल’ राज; हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

“महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे संविधानाची उघड पायमल्ली आहे. पुण्यात मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी गँगमध्येच एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हे सरकार नसून ‘ट्रिपल इंजिन सरकारची गँग’ आहे आणि या गँगमध्ये आता टोळीयुद्ध पेटले आहे. आगे आगे देखो होता है क्या!”, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’मधील बेकायदेशीर पोलीस बंदोबस्त आणि आदिवासी विद्यार्थ्यांची अडवणूक, अन्न व नागरी पुरवठा विभागातील तांदूळ घोटाळा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांवरील आरोप, ‘सत्याग्रह’ पोर्टल आणि विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीची रणनीती यावर सविस्तर आणि आक्रमक भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी