![]()
राज्यात सध्या विधानपरिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची मोठी रणधुमाळी सुरू आहे. सांगली, कोल्हापूरसह अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांनी अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तीन अपत्ये असल्याच्या मुद्द्यावरून ते या निवडणुकीसाठी अपात्र असल्याची चर्चा विरोधकांकडून सुरू असतानाच, त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना राम शिंदे यांनी सांगितले की, कोणत्याही राजकीय दबावापोटी किंवा वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. तर, विधान परिषदेचे सभापती या घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता अबाधित राखण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक आणि जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी या दोन संस्थांमधून आपला ठराव बिनविरोध मंजूर झाला होता, असे सांगत त्यांनी कर्जत-जामखेडमधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीचे आणि तयारीचे विशेष कौतुक केले. राम शिंदे यांच्या उमेदवारीवरून मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय गोंधळ सुरू होता. त्यांचे प्रमुख राजकीय विरोधक आमदार रोहित पवार यांनी ‘शिंदे यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचा अर्ज कायदेशीररीत्या टिकणार नाही’, असा थेट दावा केला होता. या आरोपांवर सुरुवातीला प्रतिक्रिया देताना आपण नियमांच्या चौकटीत राहूनच अर्ज भरला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आज त्यांनी अचानक आपण जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राम शिंदे यांच्या या माघारीमागे सहकार कायद्यातील एक अत्यंत महत्त्वाचा नियम कारणीभूत ठरला आहे. महाराष्ट्र सहकार कायद्यातील निवडणुकीच्या नियमांनुसार, ज्या व्यक्तीला 7 सप्टेंबर 2002 नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल, ती व्यक्ती कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरते. सहकारातील याच कायदेशीर नियमाचा मोठा अडसर राम शिंदे यांच्या उमेदवारीच्या आड आल्याने त्यांना अखेर या निवडणुकीतून बाहेर पडावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
Source link
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक:राम शिंदे यांची निवडणुकीतून माघार, 'तीन अपत्ये' प्रकरणाच्या चर्चेला पूर्णविराम