Headlines

मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू:पाणी मागितले, पण मित्रांनी पाजली दारू; अल्पवयीन मुले ताब्यात




राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा आणि सेवनाचा विळखा आता सामान्य माणसांच्या दारापर्यंत पोहोचला आहे. याचे विदारक वास्तव दाखवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आली आहे. मालाड पूर्वेकडील कुरारच्या आप्पापाडा भागात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली असून या व्यसनाचे गांभीर्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तो अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओमध्ये ड्रग्जची भयानक नशा चढलेली काही किशोरवयीन मुले दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोन मुले मिळून एका दुसऱ्या मुलाच्या हातात जबरदस्तीने ड्रग्जचे इंजेक्शन देताना यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील अनेक लहान मुले ड्रग्जच्या आहारी गेली असून, याच व्यसनातून ओव्हरडोस झाल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकारामुळे कुरार परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांची धडक कारवाई हा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुरार पोलिस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. या व्हिडीओची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यात दिसणाऱ्या सर्व मुलांना शोधून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि चौकशीत व्हिडीओमध्ये दिसणारी ही सर्व मुले अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाणी मागितले, पण मित्रांनी दारू पाजली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण ताब्यात घेतलेल्या तीन मुलांना घेऊन आप्पापाडा येथील उद्यानात ड्रग्ज घेण्यासाठी आला होता. यातील दोन मुलांनी पहिल्यांदाच ड्रग्जचे सेवन केले होते. ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे मयत मुलाची तब्येत अचानक बिघडली आणि त्याने मित्रांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, पाण्याच्या ऐवजी मित्रांनी त्याला बाटलीतून दारू पाजली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी सध्या ‘एडीआर’ दाखल केला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाणार आहे. नगरसेवकांचा धक्कादायक खुलासा या गंभीर घटनेबाबत शरद पवार गटाचे स्थानिक नगरसेवक अजितराव रावराणे यांनी काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. त्यांच्या मते, मालाडचा आप्पापाडा हा झोपडपट्टीचा भाग असून इथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची खुलेआम विक्री केली जाते. त्यामुळेच येथील लहान मुले या जाळ्यात सहज ओढली जात आहेत. ही मुले ज्या ठिकाणी ड्रग्ज घेत होती, ते याच परिसरातील शारदाबाई गोविंद पवार उद्यान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारवाईतील अडथळे आणि पळवाटा परिसरातील या अवैध धंद्यांबाबत नगरसेवक रावराणे यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस या प्रकरणी कारवाई करतात आणि आरोपींना पकडतात. परंतु कायदेशीर पळवाटांचा आधार घेत हे आरोपी कोर्टातून लवकर जामिनावर सुटून येतात. बाहेर आल्यानंतर हे गुन्हेगार पुन्हा कोणतीही भीती न बाळगता झोपडपट्टी परिसरात ड्रग्जची विक्री आणि सेवन राजरोसपणे सुरू करतात. भौगोलिक परिस्थितीचा गैरफायदा आप्पापाडा परिसराची भौगोलिक रचनाही या अवैध व्यवसायाला पोषक ठरत आहे. हा भाग डोंगराळ असून तो वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या डोंगरावर जवळपास 28 ते 30 हजार लोकांची दाट वस्ती आहे. याच वस्तीचा आणि भौगोलिक रचनेचा फायदा घेत इथे ड्रग्जचा मोठा बाजार चालवला जातो. जेव्हा पोलीस या भागात कारवाई करण्यासाठी जातात, तेव्हा आरोपी आजूबाजूच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी होतात, अशी माहितीही रावराणे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *