![]()
जळगाव जिल्ह्यातून गुन्हेगारी आणि अपघातांच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात काही दिवसांपूर्वी महिलेच्या छेडछाडीच्या वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाली होती. या तुफान हाणामारीत मिलन सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र, नुकताच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेला आता खुनाचे वळण लागले आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यात दोन्ही गटांकडून एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आधीच 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत यातील 10 जणांना अटकही केली आहे. मात्र, जखमी मिलन सोनवणे याने उपचारादरम्यान प्राण सोडल्यामुळे, पोलिसांनी आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आहे. एका साध्या वादाचे रूपांतर अशा भीषण हत्येत झाल्यामुळे लोंणजे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पाचोरा पोलिसांनी शहरातील एसबीआय बँक परिसरातून झालेल्या चोरीचा यशस्वी छडा लावला आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया गावातून रितीक सिसोदिया या आंतरराज्यीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, त्याच्याकडून चोरीला गेलेली 77 हजार 500 रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. दरम्यान, जळगाव शहरालगत घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला दुचाकीने निघालेल्या ललित मनोहर झंवर (वय 30) या तरुणाचा बायपासवर अपघाती मृत्यू झाला. पाळधीच्या टहाकळी फाट्याजवळ एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ललित गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे, येत्या नवरात्रोत्सवात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होणार होती; मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. महामार्गावरील अपघातांचा हा गेल्या दोन महिन्यांतील आठवा बळी ठरला आहे.
Source link
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ:चाळीसगावात तरुणाची हत्या, तर पाचोऱ्यात बँक चोरीचा उलगडा