“नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवले जात आहे. पहाटे 4 वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आणि सकाळी 7वाजता दादरच्या ‘टिळक भवन’मध्ये पोलिसांनी विनावॉरं
.
मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पोलीस कारवाईनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि अधिकृत वक्तव्यातून महायुती सरकारवर थेट तोफ डागली. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण, आश्रमशाळांमधील दुरवस्था, आझाद मैदानातील आंदोलनांवर घातलेली गदा आणि मुंबई एनएसयूआय अध्यक्षांच्या अटकेवरून गृहमंत्रालयाला थेट पिंजऱ्यात उभे केले.
पहाटे 4 वाजता विनावॉरंट घुसखोरी; विद्यार्थिनींशी गैरवर्तन!
काँग्रेस कार्यालयातील मध्यरात्रीच्या पोलीस कारवाईचा पाढा वाचताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पहाटे 4 वाजता कसलाही सर्च वॉरंट किंवा कायदेशीर आदेश नसताना पोलिसांनी काँग्रेस कार्यालयात घुसखोरी केली. इतकेच नव्हे, तर नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या मुलींना शौचालयातून बळजबरीने बाहेर काढण्यात आले. मुलींशी अशा प्रकारे गैरवर्तन करण्याची हिंमत पोलिसांमध्ये कुठून आली? हे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे ढोंग करणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच घडू शकते.”

परिसराला छावणीचे स्वरूप
“नाशिक, जळगाव, साताऱ्यातून आलेली ही मुले महाराष्ट्राचे भविष्य आहेत. ती आपल्या हक्कासाठी आली असताना संपूर्ण काँग्रेस कार्यालयाभोवती बॅरिकेड्स लावून पोलीस छावणी तयार करण्यात आली. मुख्य गेट बंद करून विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले. ही कोणती लोकशाही आहे?”
आदिवासी मंत्र्यांची मुले हे अन्न खातील का?
आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, “आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसाठी शासनाने सेंट्रलाइज्ड किचन सुरू केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना 4 ते 5 तास उशिरा, थंड आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी विकास मंत्र्यांना विचारले की, ‘तुमची स्वतःची मुले असे अन्न खाऊ शकतील का?’ मग आमच्या गरीब आदिवासी मुलांवर हा अन्याय का?”
शिक्षणाचा अधिकार आणि शाळा बचाव
“मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, आश्रमशाळांमध्ये चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत, रिक्त पदांवर योग्य शिक्षक नेमले जावे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी येणारा निधी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचावा, या साध्या मागण्यांसाठी ही मुले मुंबईत आली आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांचा आवाज दडपून टाकत आहे.”
आझाद मैदान आकसले; आंदोलने दडपण्याचा सरकारी कट
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना जागा नाकारल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर बसण्याची परवानगी हवी आहे. मात्र, सरकारने ‘जनसुरक्षा विधेयका’च्या नावाखाली आंदोलने चिरडण्याचा घाट घातला आहे. आझाद मैदानाचा आकार दिवसेंदिवस छोटा केला जात असून, 25 आंदोलने असल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई केली जात आहे.”
संसदेपर्यंत आवाज उठवणार
“विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायला जागा नसेल, तर पर्याय कोण देणार? आम्ही संविधानाला आणि लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जर विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क दिले नाहीत, तर हा मुद्दा थेट देशाच्या संसदेत मांडला जाईल.”
प्रद्युम यादव यांना अटक; मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी!
विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा त्यांनी तीव्र निषेध केला. “काँग्रेस कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याच्या बेकायदेशीर कारवाईला विरोध करणारे मुंबई एनएसयूआयचे अध्यक्ष प्रद्युम यादव यांना पोलिसांनी अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दडपशाहीचा आम्ही जाहीर धिक्कार करतो.”
‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालू
“संबंधित बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची सन्मानाने सुटका करून त्यांच्याशी सरकारने तात्काळ संवाद साधावा; अन्यथा काँग्रेस पक्ष या सर्व विद्यार्थ्यांसह थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याला आणि मंत्रालयाला घेराव घालेल,” असा इशारा खासदार वर्षा गायकवाड यांनी शेवटी दिला.
—————————————
हेही वाचा…
आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून पोलिसांकडून धमक्या: विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; दडपशाही थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यातच अडवून त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असून, ही दडपशाही त्वरित थांबवावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी